breaking-newsमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ७९ हजार ७७९ वर

  • मुंबईत ९१०, पुण्यात २,९५५ नवे रुग्ण

मुंबई – महाराष्ट्रात गुरुवारी दिवसभरात ११ हजार ५१४ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर ३१६ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला. यासह महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ४ लाख ७९ हजार ७७९ वर पोहोचली आहे. तर कोरोनाबळींचा आकडा १६ हजार ७९२ इतका झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात सध्या १ लाख ४६ हजार ३०५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून ३ लाख १६ हजार ३७५ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत गुरुवारी ९१० नवीन रुग्णांची नोंद झाली असून, ९८८ जण कोरोनामुक्त झाले. तर दिवसभरात ५७ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील रुग्णवाढीचा वेग कमी झाला असून सरासरी रुग्णवाढ ०.८७ टक्के, तर रुग्ण दुप्पटीचा कालावधी ८० दिवसांवर गेला आहे. सध्या मुंबईतील एकूण बाधितांची संख्या १ लाख २० हजार १६५ वर पोहोचली आहे. त्यापैकी ९२ हजार ६६१ म्हणजेच ७७ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ६ हजार ६४५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्यूदर ५.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. मृतांमध्ये ५० वर्षांवरील व्यक्तींची संख्या अधिक आहे.

पुणे जिल्ह्यात गुरुवारी एकूण कोरोना रुग्णांचा आकडा एक लाखाच्या पार गेला. गुरुवारी रात्री ९ वाजेपर्यंत पुण्यात १ लाख २६४ रुग्ण नोंदले गेले. यात दिवसभरातील २ हजार ९५५ नव्या कोरोना रुग्णांचा समावेश आहे. यापैकी पुणे शहरातील १ हजार ४४० जण आहेत. तर पुणे शहरापाठोपाठ गुरुवारी पिंपरी-चिंचवडमध्ये १ हजार १२, जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात २७०, नगरपालिका क्षेत्रात ११८ आणि कंटेन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात ११५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. दरम्यान, गुरुवारी दिवसभरात पुण्यात ५९ रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच पुणे शहरातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांपैकी ७० हजार ९०४ जण उपचारानंतर पूर्णपणे बरे म्हणजेच कोरोनामुक्त झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button