breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचा अखेर राजीनामा

मुंबई – राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे. दीपक सावंत शिवसेनेच्या कोटयातून मंत्री होते. डॉ. सावंत यांच्या विधान परिषद सदस्यत्वाची मुदत ७ जुलै २०१८ रोजी संपली. त्यानंतरही ते मंत्रिपदावर कार्यरत होते. कोणत्याही मंत्र्याला विधिमंडळाच्या सहा महिन्यांच्या कालावधीत दोन्ही सभागृहांपैकी एका सभागृहाचे सदस्य म्हणून निवडून येण्याचे घटनात्मक बंधन आहे.

शिवसेनेने सावंत यांच्या जागी मंत्रिपदासाठी दुसरे नाव सुचविण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडत अयोध्येतील राम मंदिरप्रश्नी संघर्षांची भूमिका घेतली असताना एका मंत्रिपदाची अभिलाषा ठेवून नवीन नावाची शिफारस करण्यावरुन शिवसेनेत संभ्रम असून ठाकरे सोमवारी अंतिम निर्णय घेणार आहेत.

युतीबाबत भाजप नेते सकारात्मक असल्याचे सांगत असले तरी शिवसेना आक्रमक असून राम मंदिराचा प्रश्न व अन्य मुद्दय़ांवरून भाजप नेतृत्वावर सातत्याने शरसंधान सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर मंत्रिपदासाठी एका नावाची शिफारस केल्यास शिवसेना सत्तेसाठी हपापलेली आहे, अशी टीका होऊ शकते व जनतेमध्ये चुकीचा संदेश जाईल. स्वबळाचा निर्णय जाहीर केल्यापासून शिवसेना सत्तेबाहेर कधी पडणार, हा प्रश्न विरोधकांकडून सातत्याने विचारला जात आहे. त्यामुळे तूर्तास शिवसेनेच्या अन्य चार कॅबिनेट मंत्र्यांपैकी एकाकडे आरोग्य खात्याचा कार्यभार दिल्यास शिवसेनेने कणखर भूमिका घेतली आहे, हे दिसून येईल, असे काही शिवसेना नेत्यांचे मत आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button