breaking-newsमुंबई

बेस्टचे अस्तित्व, नोकरी टिकविण्यासाठी संप टाळावा

  • वेतन करारातील थकबाकी न मिळालेल्या निवृत्तांची कर्मचाऱ्यांना साद

वेतन निश्चिती आणि नवा वेतन करार करण्याच्या मुख्य मागणीसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांचे मतदान घेऊन कामगार संघटनांनी संपाचा इशारा दिला आहे. मात्र, बेस्टचे अस्तित्व आणि आपली नोकरी टिकविण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप टाळावा, अशी साद बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी घातली आहे.

निवृत्तीनंतर चार-पाच वर्षांनीही वेतन कराराची थकबाकीची रक्कम पदरात न पडल्यामुळे बेस्टमधील तब्बल साडेतीन हजारांहून अधिक निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यासाठी झगडावे लागत आहे. प्रशासन आणि कामगार संघटनांनीही पाठ फिरविल्यामुळे ही निवृत्त मंडळी हैराण झाली आहेत.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतन कराराची मुदत संपुष्टात आल्यानंतर नवा वेतन करार करण्यात बराच कालावधी गेला. अखेर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा नवा करार २०१२-१३ च्या सुमारास करण्यात आला. परिवहन विभाग आणि सामान्य प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांना २००६ ते २०१२, विद्युत पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना २००९ ते २०१२, तर अ आणि ब श्रेणी अधिकाऱ्यांना २०११ ते २०१२ या कालावधीची थकबाकी देण्यावर शिक्कामोर्तब झाले. बेस्ट उपक्रमातून ८ फेब्रुवारी २०१३ ते २८ फेब्रुवारी २०१७ या काळात निवृत्त झालेल्या तब्बल ३७७६ कर्मचाऱ्यांना आजतागायत वेतन करारानुसार थकबाकीची रक्कम मिळालेली नाही. वेतन करारातील सुधारणांनुसार या कर्मचाऱ्यांची थकबाकीची रक्कम २५ कोटी ५१ लाख रुपयांच्या घरात आहे. प्रत्येक निवृत्ताला सरासरी दीड ते दोन लाख रुपये मिळणे बाकी आहेत. थकबाकीसाठी निवृत्त कर्मचारी उपक्रमाच्या कार्यालयात खेटे घालत आहेत. वारंवार प्रशासन, कामगार संघटना आणि सत्ताधारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीही घेत आहेत. मात्र बेस्टची आर्थिक स्थिती डळमळीत असल्याचे उत्तर देऊन निवृत्तांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली.

निवृत्तीनंतर थकबाकी न मिळाल्याने आम्ही आज जात्यात आहोत. सेवेत असलेले कर्मचारी सुपात आहेत. बेस्टची स्थिती नाजूक असल्याने संप झालाच तर सर्वाचेच नुकसान होईल. गिरणी कामगारांसारखी बेस्ट कर्मचाऱ्यांची अवस्था होईल. नवा वेतन करार करण्याआधी पूर्वी केलेल्या वेतन करारातील थकबाकीचा प्रश्न निकालात काढावा.   -श्यामराव कदम, निवृत्त बेस्ट कर्मचारी

सवलतीही बंद

निवृत्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून बेस्ट बसमधून मोफत प्रवास करण्याची सवलत बंद करण्यात येत आहे. आधी आमची देणी पूर्ण द्यावी आणि मगच सवलती बंद कराव्या, असा पवित्रा निवृत्त कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button