breaking-newsताज्या घडामोडीपुणे

राजू शेट्टी- महादेव जानकर यांची पुण्यात भेट

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी आज पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची भेट घेतली. पुण्यातील हॉटेल आर्चिड येथे ही भेट झाली. यावेळी शेट्टींसह रविकांत तुपकरही उपस्थित होते. यावेळी जानकर यांनी राजू शेट्टी यांना चौथी आघाडी करण्याचा प्रस्ताव दिला. मात्र, पुढील तपशील समजू शकला नाही.

महादेव जानकर, राजू शेट्टी आणि स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आज सकाळी बाणेर येथील हॉटेल ऑर्चिड येथे भेट घेतली. यावेळी युती आणि आघाडी आपल्याला जुमानत नसल्यास आपण चौथी आघाडी करायला काय हरकत आहे अशी चर्चा केली. तसेच मला युतीने व तुमचा आघाडीने मान-सन्मान न राखल्यास आपण एक वेगळा प्रयोग करून चौथी आघाडी करू, ऑफर जानकर यांनी शेट्टी यांना दिली.

महादेव जानकर यांच्या रासपला यंदा लोकसभेची एकही जागा सोडली जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जानकर अस्वस्थ आहेत. गेल्या वेळी जानकर यांना बारामतीची लोकसभेची जागा सोडण्यात आली होती. मात्र, यंदा भाजपकडून बारामतीचा उमेदवार कोण याबाबत काहीही हालचाल होताना दिसत नाहीये. जानकर यांनी बारामतीसह माढ्यातून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, भाजपने त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे पसंत केले आहे.

दुसरीकडे, राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काँग्रेस-राष्ट्रवादीकडे तीन जागांची मागणी केली आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या हतकंणगले मतदारसंघासह वर्धा आणि बुलढाणा या तीन जागा स्वाभिमानीने मागितल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातील हतकंणगले ही जागा शेटटींसाठी सोडली आहे. मात्र, वर्धा किंवा बुलढाण्यापैकी एक जागा काँग्रेस सोडण्यास तयार नाही. त्यामुळे स्वाभिमानीने आघाडीमध्ये जाण्यास नकार दिला आहे. किमान दोन जागा द्या व याचा निर्णय दोन दिवसात घ्या अन्यथा स्वबळावरून लढून राज्यातील १५ ठिकाणी आमचे उमेदवार उभे करू असा इशारा रविकांत तुपकर यांनी काँग्रेस आघाडीला दिला आहे.

आता युतीने दुर्लक्षित केलेले महादेव जानकर, राजू शेट्टी व इतर छोटे पक्ष एकत्र येऊन राज्यात चौथी आघाडी स्थापन करण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे जानकरांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजप करते का? हे पाहावे लागेल. तसेच शेट्टींना काँग्रेस दुसरी जागा सोडणार का यावर चौथ्या आघाडीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button