राजकारण वेगळ्या ठिकाणी, कुटुंब वेगळ्या ठिकाणी : अजित पवार
मुंबई : 23 नोव्हेंबरला उमुख्यमंत्रीपदाची शपथ आणि 26 नोव्हेंबरला उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा… गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय नाट्यानंतर अजित पवार यांनी पहिल्यांदाच माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “राजकारण वेगळ्या ठिकाणी, कुटुंब वेगळ्या ठिकाणी. मी राष्ट्रवादीतच होतो, आहे आणि राहणार,” असं अजित पवार म्हणाले. विधानभवनात आज सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडल्या. शपथविधीला जाण्यापूर्वी अजित पवारांनी पवारसाहेब आमचे नेते असून आपण राष्ट्रवादीतच असल्याचं सांगितलंय
मंगळवारी दुपारी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न यशस्वी झाल्याचं म्हटलं जात होतं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काल (26 नोव्हेंबर) रात्री सिल्वर ओकवर भेट घेतल्यानंतर पवार कुटुंबातील दूरावा संपल्याचा स्पष्ट झालं. त्यानंतर आज पवार कुटुंबात सर्व आलबेल असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.