breaking-newsपुणेमहाराष्ट्र

रस्ते काँक्रिटीकरणासाठी पिण्याचे पाणी

टंचाईतही पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होणार

पुणे : सिमेंटचे रस्ते करण्यासाठी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याऐवजी शुद्ध पाणी वापरणे अत्यावश्यक असल्याचा निर्वाळा रस्ते बांधणीतील तज्ज्ञांनी दिला असल्याने आधीच पाणीटंचाई असताना सिमेंटच्या रस्त्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा बेसुमार वापर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात आणि पाणीटंचाईत काँक्रिटीकरणाचा धडाका कायम राहणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

रस्ते सिमेंटचे करण्यासाठी पाण्याचा मोठा वापर होत असल्याच्या आणि धरणातील घटत्या पाणीसाठय़ाच्या पाश्र्वभूमीवर काँक्रिटीकरणाची जुनी आणि नवीन कामे थांबविण्याचा निर्णय महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतला होता. त्यावर नगरसेवकांमध्ये तीव्र पडसाद उमटले. अंदाजपत्रकातील निधी खर्च करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी राहिल्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी काँक्रिटीकरणाची कोटय़वधी रुपयांची शेकडो कामे मंजूर करून घेतली होती. त्यामुळे आयुक्तांनी हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. या दबावापुढे झुकत आयुक्तांनी प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरून सिमेंट काँक्रिटचे रस्ते करावेत, असे आदेश दिले होते. मात्र रस्ते सिमेंटचे करण्यासाठी पाण्याचा दर्जा योग्य असावा असा निकष असल्यामुळे यापुढे सर्रास पिण्याच्या पाण्याचा वापर होणार हे अधोरेखीत झाले आहे.

सिमेंट रस्त्यांच्या टिकाऊपणासाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी उपयुक्त ठरत नाही. सिमेंट रस्त्यांसाठी पाण्याचे काही निश्चित निकष आहेत. त्या निकषांपेक्षा कमी दर्जाच्या किंवा गुणवत्तेच्या पाण्याचा वापर सिमेंटचे रस्ते करताना झाल्यास रस्ते खराब होण्याची दाट शक्यता असते. अशा पाण्यामुळे रस्त्यांचा टिकाऊपणा कायम रहात नाही. कमी दर्जाचे पाणी वारल्यास रस्त्यांच्या गुणवत्तेवर थेट परिमाण होतो. पाण्यातील पीएच व्हॅल्यू सहापेक्षा कमी असेल तर सिमेंटचे रस्ते लगेच खराब होतात, असे सातत्याने निदर्शनास आले आहे. महापालिकेच्या सांडपाणी केंद्रातील प्रक्रिया केलेल्या पाण्याबाबतही सातत्याने साशंकतता व्यक्त करण्यात आली आहे.

प्रक्रिया केलेले हे पाणी उपयुक्त आहे का, याबाबतही विचारणा झाली आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा दर्जा योग्य नसल्यामुळे या पाणीवापरावरही मर्यादा आल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. या पाश्र्वभूमीवर सिमेंटचे रस्ते करण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर  करावा लागणार आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर पाणी काटकसरीने वापरण्याचा सल्ला देणारी महापालिका पिण्याच्या पाण्याची मोठय़ा प्रमाणावर उधळपट्टी करणार आहे.

नागरी चेतना मंचचे मेजर जनरल (निवृत्त) सुधीर जठार यांनीही एका निवेदनाद्वारे ही बाब महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. सांडपाणी केंद्रात प्रक्रिया केलेल्या पाण्याची गुणवत्ता आधी तपासावी आणि त्यानंतरच त्याचा वापर करावा, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.

कोटय़वधींचे प्रस्ताव

पाणी काटकसरीने वापरण्याचा सल्ला दिला जात असला, तरी पिण्याच्या पाण्याचा मोठय़ा प्रमाणावर अपव्यय होणार असल्याची वस्तुस्थिती यानिमित्ताने पुढे आली आहे. नागरिकांची मागणी नसतानाही गल्लीबोळात सिमेंट काँक्रिटीकरण करण्याच्या २५० ते ३०० कामांच्या निविदा मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. महापालिकेच्या स्थायी समितीने आणि मुख्य सभेने यातील काही कामांना मान्यता दिली आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातूनही अनेक कामे प्रस्तावित आहेत.

प्रक्रिया केलेल्या पाण्याची गुणवत्ता आधी तपासावी आणि नंतर त्याचा वापर करावा. त्यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने गुणवत्ता तपासण्याची तयारी दर्शविली आहे. सिमेंटच्या रस्त्यांवर पावसाळी गटारांची व्यवस्था केली जात नाही. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नाही आणि रस्तेही खराब होत आहेत.

– सुधीर जठार, नागरी चेतना मंच

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button