रक्तबंबाळ झालेल्या आयेशी घोषवर २ गुन्हे दाखल, आरोपी गुंड मोकाट
नवी दिल्ली – जेएनयूमध्ये गुंडांनी घातलेला हैदौस, विद्यार्थ्यांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्याचे अनेक पुरावे जगजाहीर आहेत. मात्र, दिल्ली पोलिसांनी गुंडांच्या हल्ल्यात रक्तबंबाळ झालेल्या जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेशी घोष व अन्य १९ जणांवर २ गुन्हे दाखल केले आहेत.
जेएनयूच्या प्रशासनाने विद्यापीठातील सर्व्हरची मोडतोड व सुरक्षा रक्षकांवर हल्ले केल्याने आयेशी आणि १९ विद्यार्थ्यांवर गुन्हे नोंद करावेत अशा दोन तक्रारी दिल्ली पोलिसांकडे केल्या होत्या.
या दोन तक्रारींमध्ये केवळ ४ मिनिटांचे अंतर आहे. पण संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यामागे कोणताच पक्षपात नाही, असे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. आम्ही विद्यापीठ प्रशासनाच्या सांगण्यावरून गुन्हे दाखल केले, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला. पण याच पोलिसांनी विद्यापीठात हैदोस घातलेल्या एकाही गुंडाला अद्याप अटक केलेली नाही.