breaking-newsमहाराष्ट्र

युती तुटल्यास भाजपा – शिवसेनेचा पराभव अटळ: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवू, असे शिवसेनेने म्हटले असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. भाजपा व शिवसेनेची युती तुटल्यास निवडणुकीत दोन्ही पक्षांचा पराभव निश्चित आहे, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. शिवसेना हा आमचा जुना मित्रपक्ष असून दोन्ही पक्षांची विचारधारा समानच आहे, असे सांगत त्यांनी शिवसेनेला युतीसाठी साद घातली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘हिंदूस्तान टाइम्स’ या इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली असून यात त्यांनी युतीबाबत भाष्य केले. फडणवीस म्हणाले, युती तुटल्याचे परिणाम दोन्ही पक्षांवर होतील.काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली आणि भाजपा – शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तर मतांचे विभाजन होईल. याचा फायदा आघाडीला होईल आणि शेवटी भाजपा – शिवसेना या दोन्ही पक्षांचा पराभव होईल. त्यामुळे युतीतच दोन्ही पक्षांचा फायदा आहे, असे त्यांनी सांगितले. आम्ही स्वबळावर लढण्यास तयार आहोत. आमचा दोन- तीन जागेवर पराभव होईल. पण राष्ट्रीय स्तरावर युती अभेद्य ठेवण्याची गरज आहे. शेवटी शिवसेना हा आमचा जुना मित्रपक्ष आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.
शिवसेनेला युतीसाठी कसं तयार करणार असा प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणतात, राजकीय स्थितीच लोकांना युतीसाठी तयार करते. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष हे कट्टर विरोधक एकत्र येतील असे कधी कोणाला वाटले होते का?. महाराष्ट्रात आघाडीचे सरकार असताना राष्ट्रवादीने काँग्रेसशी फारकत घेतली होती. पण वर्षभरातच दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले. त्यामुळे युतीबाबतही हे शक्य आहे, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस हा आमच्यासाठी पर्याय नाही. शिवसेनाच आमचा जुना मित्रपक्ष आहे. भाजपा- शिवसेनेत काही मुद्द्यांवरुन मतभेद असतील पण आमची विचारधारा एकसारखीच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाची विचारधारा समान नाही. त्यामुळे तुर्तास भाजपा – राष्ट्रवादी एकत्र येणे अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले. भीमा – कोरेगाव हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच आहे. अनेक महिन्यांच्या तपासानंतरच ही कारवाई करण्यात आली, असे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button