breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

यशवंतरावांचे वजन घटल्याची चर्चा त्यावेळी शरद पवारांनीच सुरू केली : बाळासाहेब विखे-पाटील

पुणे । प्रतिनिधी

दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय वजन घटल्याची चर्चा शरद पवार यांनीच सुरू केली, असा खळबळजनक आरोप दिवंगत माजी केंद्रीय मंत्री आणि पवार यांचे कट्टर विरोधक बाळासाहेब विखे पाटील यांनी केला आहे. ‘

चव्हाण यांचे वजन घटले, की नाही, हे माहिती नाही; मात्र त्यांच्या स्वयंघोषित मानसपुत्राने स्वत:चे वजन वाढविण्याचा प्रयत्न केला,’ अशा शब्दांत नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘देह वेचावा कारणी,’ या आत्मचरित्रात त्यांनी पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन झाले. या पुस्तकात त्यांनी राजकारण, समाजकारण, शेती आणि सहकार अशा विविध विषयांवर भाष्य केले आहे. १९७७ च्या काळात मोठी राजकीय उलथापालथ झाली. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण बाजूला पडले. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा शब्द प्रमाण मानला जात होता, मात्र त्यांचे राजकीय वजन एकदम घटल्याची चर्चा पवार यांनी सुरू केली, असे विखे पाटील यांनी म्हटले आहे. मात्र, लोक चव्हाण साहेबांना विसरले नाहीत. इंदिरा गांधी यांची साथ सोडण्यात आपली गंभीर चूक झाल्याचे चव्हाण यांना जाणवले होते, असेही त्यांनी नमूद केले आहे.

‘पुलोद’नंतर घातक वळण

‘पवार यांनी पुरोगामी लोकशाही दलाचा (पुलोद) प्रयोग करून मुख्यमंत्री पद मिळविले, मात्र त्यानंतर महाराष्ट्रीत राजकारणाने सर्वार्थाने घातक वळण घेतले. पक्षापेक्षा व्यक्तिगत राजकीय बळ आणि महत्त्वाकांक्षेला महत्त्व आले. सत्तेसाठी व सत्तेपुरते राजकारण करण्याची नवी परंपरा महाराष्ट्रात सुरू झाली. सत्तेसाठी सर्व काही हा नवा मंत्र महाराष्ट्राच्या राजकारणात रुजला,’ असे विखे पाटील यांनी या पुस्तकात नमूद केले आहे.

हत्येचे प्रयत्न

आपल्याला मारण्याचे काही प्रयत्न झाले, असे विखे पाटील यांनी या पुस्तकात नमूद केले आहे. मुंबईत आपल्या घरी दोन सराईत शूटर आले आणि ‘फार मोठ्या माणसाने तुम्हाला मारण्याची सुपारी दिली आहे,’ असे त्यांनी आपल्याला सांगितले या व्यक्तिचे नावही त्यांनी सांगितले; मात्र, त्या नावाचा उल्लेख करण योग्य नाही आणि ते नाव खरे असेलच, असे नाही, असेही विखे पाटील यांनी म्हटले आहे.

शरद पवार क्षमता असलेले नेते, पण…

शरद पवार यांना महाराष्ट्राच्या प्रश्नांती अतिशय चांगली समज आहे. मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांच्याविषयी चांगले मत होते. जनतेच्या आकांक्षा उंचावल्या.राज्याच्या कनाकोपऱ्यातील कार्यकर्त्यांशी त्यांचे असणारे व्यक्तिगत संबंध ही त्यांची (पवार) फार मोठी ताकद! राज्याच्या राजकारणाला, समाजकारणाला विधायक वळण देऊन विकासकामांची गती वाढविण्याची त्यांची क्षमता होती आणि आहे. तशी संधीही त्यांना मिळत गेली. परंतु, त्यांच्यातील राजकारण्याने, त्यांच्या स्वभावाने व वागण्याने या सगळ्यावर मात केली, अशी टिपण्णी विखे पाटील यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button