breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

यंदाची एकरकमी एफआरपी द्या, अन्यथा 25 जानेवारीला साखर आयुक्त कार्यालयावर हल्लाबोल

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा

कोल्हापूर – यंदाच्या हंगामातील एकरकमी एफआरपी 24 जानेवारीपर्यंत न मिळाल्यास 25 जानेवारी रोजी पुण्याच्या साखर आयुक्‍त कार्यालयावर हल्लाबोल करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी मंगळवारी दिला. एफआरपी देण्यासाठी सरकारी तिजोरी रिकामी करू म्हणणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याचा जाब भरसभेत जाऊन विचारू, असेही शेट्टी यांनी जाहीर केले.

एकरकमी एफआरपी मिळावी, या मागणीसाठी मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चा प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाजवळ आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.

खा. शेट्टी म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी कोडोलीच्या सभेत एफआरपी अधिक 200 ची मागणी केली, हीच भूमिका आम्ही मान्य करताना फक्‍त एफआरपीचा बेस दहाऐवजी साडेनऊ टक्के करा, एवढीच मागणी केली. आमची मागणी पूर्ण झाली नाही; पण निदान एकरकमी एफआरपी तरी द्या, ती न देणार्‍या कारखान्यांवर कारवाई करा, हे सांगण्यासाठीच हा मोर्चा आहे. एफआरपीचा बेस बदलल्याने राज्यातील शेतकर्‍यांचे सुमारे 1300 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

ते म्हणाले, सरकार यावर्षी कारखानदारांना 80 टक्केच रक्‍कम द्या, असे सांगत आहे. ही जर तुमची भूमिका असेल तर याद राखा, आम्हाला रस्त्यावर उतरायला लावू नका, गावागावांत चकमकी घडल्याशिवाय राहणार नाहीत. 80ः20 फॉर्म्युल्यानेच द्यायचे असतील, तर तुमच्यात हिंमत असेल, तर तसा आदेश काढा. कायद्याची अंमलबजावणी करा अन्यथा आम्ही कायदा मोडल्याशिवाय राहणार नाही. आमच्यावर यापूर्वीच 302, 307, 395 चे गुन्हे दाखल आहेत, आता आम्हाला फक्‍त नक्षलवादी ठरवायचे राहिले आहे; पण तरीही तुम्हाला मातीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

यावर्षी पैसे कमी आहेत म्हणून आम्हाला 20 टक्के नंतर घ्या म्हणून सांगण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी या रकमेची हमी बँकांना द्यावी किंवा कारखान्यांकडून सरकारला भरावे लागणारे कर नंतर घ्यावेत, असे सांगून शेट्टी म्हणाले, कारखानदारांना सरकार व बँकांनी वेठीस धरले, तर आम्ही कारखानदारांसोबत रस्त्यावर उतरायला तयार आहोत; पण यावर्षी एकरकमी एफआरपीत कोणत्याही परिस्थितीत तडजोड करणार नाही.

इतर राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन उसासाठी काहीतरी पर्याय आणले. अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही, मुख्यमंत्र्यांनी साखरेचा हमीभाव तरी प्रतिक्‍विंटल 3400 रुपये करून आणावा, असेही शेट्टी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button