breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मेट्रो-३ चे सहावे भुयार पूर्ण

तानसा जलवाहिनीखालून मेट्रोचे काम

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ भुयारी मार्गिकेमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते सहार रोडदरम्यानचे सहाव्या भुयाराचे काम बुधवारी पूर्ण झाले. हे भुयार ६९२ मीटरचे आहे. सहार रोड मेट्रो स्थानकाच्या निर्माणस्थळावरून जाणाऱ्या मुंबईतील सर्वात जुन्या तानसा जलवाहिनीला धक्का न लावता भुयारीकरणासह स्थानक निर्माणाचे काम करण्यात आले आहे.

भारतातील सर्वात पहिल्या संपूर्ण भुयारी मेट्रो मार्गिकेचे काम सध्या शहरात वेगाने सुरू आहे. यातील पाच भुयारांचे काम पूर्ण झाले आहे. तर प्रकल्पातील आंतरराष्ट्रीय विमानतळ ते सहार रोडदरम्यानचे सहावे भुयार बुधवारी खोदून पूर्ण झाले. भुयारीकरणासाठी वापरण्यात आलेले ८९ मीटर लांब ‘तापी १’ या टीबीएम यंत्राने ६९२ मीटरचे भुयार १६० दिवसात खणले. या दरम्यान यंत्राचा वेग प्रतिदिवस ४.३१ मीटर इतका होता. आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील निर्माण स्थळावरून या यंत्राने गेल्या वर्षी १३ सप्टेंबरला भुयारीकरणाचे काम सुरू केले होते. १५० निष्णात अभियंते आणि कामगारांची फौज यासाठी कार्यरत होती. ब्रेशिया आणि बेसाल्ट यांसारख्या कठीण खडकांना भेदत ‘तापी १’ने ४९५ आरसीसी सिमेंट रिंग्सचा वापर करत भुयार तयार केले आहे.

महत्त्वाचे म्हणजे सहार रोड स्थानकात ज्या ठिकाणी टीबीएम यंत्र भुयार खोदून बाहेर पडले तेथून मुंबईला पाणीपुरवठा करणारी सर्वात जुनी तानसा जलवाहिनी जाते. त्यामुळे भुयारीकरणासह निर्माणकार्याचा या वाहिनीला धक्का लागू नये म्हणून लोखंडी पूल बांधण्यात आला आहे. या जलवाहिनीला आधार देणारा लोखंडी पूल उभारून त्याखालून सध्या मेट्रोचे खोदकाम सुरू आहे.

मेट्रो-३ च्या संपूर्ण प्रकल्पात सहार मेट्रो स्थानकाची बांधणी सर्वात महत्त्वपूर्ण आणि आव्हानात्मक आहे. मुंबईची सर्वात महत्त्वाची जलवाहिनी ‘तानसा’ला संपूर्णपणे सुरक्षित ठेवून त्याखालून सहार मेट्रो स्थानकाच्या बांधणीचे काम पार पाडण्यात यश आले आहे.

– अश्विनी भिडे, संचालिका, ‘एमएमआरसी’ (मेट्रो-३)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button