breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मेट्रोचे ३१ किमी भुयारीकरण पूर्ण

कुलाबा ते सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पाच्या मार्गिकेच्या भुयारीकरणाच्या १५व्या टप्प्याचे काम शुक्रवारी सकाळी पूर्ण झाले. वैतरणा १ हे टनेल बोअिरग मशीन (टीबीएम) शुक्रवारी सकाळी ३.८१४ किमी अंतराचे भुयारीकरण पूर्ण करून मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानकाजवळ बाहेर आले. या टप्प्यासोबतच मेट्रो-३ साठी ३१ किमीच्या मार्गाचे भुयारीकरण पूर्ण झाले आहे.

आझाद मैदान मेट्रो स्थानकापासून या भुयारीकरणाची सुरुवात डिसेंबर २०१७ मध्ये करण्यात आली. महिन्याला १९० मीटर या सरासरी वेगाने जमिनीपासून २० मीटर खोल हे भुयार तयार करण्यात आले. वैतरणा टीबीएम यंत्राने या भुयारासाठी २७२० सेगमेंट रिंग्जचा वापर करण्यात आला. भूगर्भात बेसाल्ट आणि ब्रेसिया या कठीण खडकातून मार्गक्रमण करत हे काम पूर्ण करण्यात आले. वैतरणा हे मेट्रो ३ प्रकल्पातील डाऊनलाइन भुयार पूर्ण करणारे पहिले टीबीएम यंत्र ठरल्याचे मेट्रो ३च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मेट्रो ३ प्रकल्पातील पॅकेज २ मधील या टप्प्यात २८ ऐतिहासिक वारसा वास्तू, जुन्या इमारती आणि १४ उंच इमारतींचा समावेश आहे. त्यामुळे येथे भुयारीकरणाचे काम करताना सुरक्षिततेची काळजी घेत भुयारीकरण करण्यात आल्याचे मेट्रो ३ च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘पॅकेज २ मधील या भुयारीकरणाचे काम अतिशय आव्हानात्मक काम होते. पण पॅकेज २चे काम आम्ही दिलेल्या वेळेत पूर्ण केल्याने आमचा आत्मविश्वास दुणावला आहे.’’ असे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी सांगितले.

या भुयारीकरण टप्प्याच्या कार्यक्रमास राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार गुप्ता आणि पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दृष्टिक्षेपात मेट्रो ३

* २७ थांबे

* भुयारीकरणासाठी १७ ‘टीबीएम’

* सात ठिकाणी मोठी विवरे (लाँचिंग शाफ्ट)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button