breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

नायर रुग्णालयातील सात कृत्रिम श्वसन यंत्रणा बंद

एकीकडे मुंबईसारख्या शहरामध्ये पालिका रुग्णालयांतील कृत्रिम श्वसन यंत्रणा अपुऱ्या पडत असताना मात्र नायर रुग्णालयात कार्यरत असलेल्या ८३ कृत्रिम श्वसनयंत्रणांपैकी सात यंत्रणा बंद आहेत. यातील पाच यंत्रणा तर गेल्या सहा महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत.

नायर रुग्णालय हे पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांपैकी एक आहे. या रुग्णालयातील वैद्यकीय अतिदक्षता विभागात (एमआयसीयू) २२ खाटा आहेत. या विभागातील पाच कृत्रिम यंत्रणा गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहेत. या यंत्रणेतील तांत्रिक बिघाड झाला असून त्याबाबत संबंधित कंपनीलाही कळविले आहे. यंत्रणेतील ऑक्सिजन सेन्सर कार्यरत नसल्याने ते बदलणे आवश्यक आहे. हे सेन्सर खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे रुग्णालयाने सांगितले आहे. मात्र सहा महिने उलटले तरी ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णांना ठेवण्यात येणाऱ्या खोलीतील (आरआर) एक कृत्रिम श्वसन यंत्रणा जानेवारी २०१९ पासून बंद अवस्थेत आहे. यातील कम्प्रेसर अकार्यक्षम असल्याने यंत्रणा बंद असून ही यंत्रणा कधी सुरू होईल याबाबत रुग्णालयालाही कल्पना नसल्याचे माहितीच्या अधिकारात रुग्णालय प्रशासनाने कळविले आहे. आयपीसीयू विभागातील एक कृत्रिम श्वसन यंत्रणा तांत्रिक बिघाडामुळे अकार्यक्षम आहे. जवळपास एक महिन्यापासून ही यंत्रणा बंद अवस्थेत आहे.

रुग्ण माघारी पाठवण्याची वेळ?

नायर रुग्णालयात एकूण ८३ कृत्रिम श्वसनयंत्रणा उपलब्ध आहेत. यातील सात यंत्रणा दुरुस्त होण्यासारख्या असूनही गेल्या काही महिन्यांपासून बंद आहेत. रुग्णालयात दर दिवशी सर्वसाधारणपणे १५ रुग्णांना कृत्रिम श्वसनयंत्रणेची आवश्यकता भासते. कृत्रिम श्वसनयंत्रणा उपलब्ध नसल्याने दर दिवशी एक ते दोन रुग्णालयांना माघारी पाठविले जात असल्याची माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिली.

रुग्णसेवेवर परिणाम नाही

एमआयसीयूमध्ये २० कृत्रिम श्वसनयंत्रणा उपलब्ध असून दोन यंत्रणा भंगारात काढल्या आहेत, तर इतर दोन यंत्रणांसाठी ऑक्सिजन सेन्सर खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. इतर  बंद आरआर आणि आयपीसीयूमधील बंद अवस्थेतील कृत्रिम श्वसन यंत्रणा पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या यंत्रणा बंद असल्याने मात्र रुग्णांना कोणताही फटका बसत नसल्याचे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button