breaking-newsआंतरराष्टीय

मूलपेशी उपचार पद्धतीने रुग्ण एड्स आणि कर्करोगमुक्त

भारतीय संशोधकासह वैज्ञानिकांचा दावा

मूलपेशी प्रत्यारोपण तंत्राने ब्रिटनमध्ये एका रुग्णाला एचआयव्हीमुक्त करण्यात यश आले आहे. जगातील अशा प्रकारचे हे दुसरे उदाहरण असून पुरुष रुग्णावर मूलपेशी प्रत्यारोपण करण्यात आल्यानंतर त्याच्यात एचआयव्हीची लक्षणे दिसली नाहीत. भारतीय वंशाच्या संशोधकासह काहींनी हे संशोधन केले असून ते ‘नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. या रुग्णाचे नाव देण्यात आलेले नसून त्याला २००३ मध्ये एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. नंतर त्याला २०१२ मध्ये हॉजकिन लिम्फोमा हा रोग झाला. त्यानंतर त्याच्यावर हॉजकिन कर्करोगासाठी  केमोथेरपीचे उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याच्यात एचआयव्ही प्रतिरोध असलेल्या दात्याच्या मूलपेशींचे प्रत्यारोपण करण्यात आले त्यामुळे कर्करोग व एचआयव्ही हे दोन्ही रोग नष्ट झाले. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार अठरा महिने या रुग्णात एचआयव्ही व कर्करोगाची बाधा दिसली नसून तो कोणतीही औषधे घेत नाही. त्यामुळे मूलपेशी प्रत्यारोपण उपचारांवर खात्रीशीर उपाय म्हणून शिक्कामोर्तब झाले आहे. याच पद्धतीने एचआयव्ही व कर्करोगमुक्त करण्यात आलेला हा दुसरा रुग्ण आहे. ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनचे प्राध्यापक रवींद्र गुप्ता यांनी सांगितले, की लंडनमधील हा रुग्ण होता. त्याच्यावर हा प्रयोग यशस्वी झाला. दहा वर्षांपूर्वी बर्लिनमधील रुग्णावरच असे उपचार करून त्याच्यात अस्थिमज्जा रोपण करण्यात आले होते. त्यात विषाणूला प्रतिरोध असलेल्या दात्याच्या अस्थिमज्जेचा वापर करण्यात आला होता. दोन्ही रुग्णांवर मूलपेशी उपचार करण्यात आले. त्यांना ज्या दात्यांच्या मूलपेशी देण्यात आल्या त्या दात्यांच्या पेशींमध्ये सीसीआर ५ डेल्टा ३२ या प्रकारचे जनुकीय उत्परिवर्तन झाल्याने त्यांना एचआयव्हीची लागण होऊच शकत नव्हती. त्यांच्या मूलपेशी या रुग्णांना देण्यात आल्या. संशोधकांनी म्हटले आहे, की यात एचआयव्ही बरा केला असा शब्दप्रयोग करणे अजूनही धाडसाचे होईल. टिमोथी ब्राऊन या व्यक्तीवर पहिल्यांदा हे उपचार करण्यात आले होते व त्याला ल्युकेमिया म्हणजे रक्ताचा कर्करोग व एचआयव्ही एड्समधून मुक्तता मिळाली होती. या संशोधनात इंपिरियल कॉलेज लंडन, केंब्रिज व ऑक्सफर्ड विद्यापीठ यांचाही सहभाग होता.

एड्सचे दरवर्षी १० लाख बळी

दरवर्षी १० लाख लोक एचआयव्ही एड्समुळे मरतात, त्यामुळे ही उपचारपद्धती आश्वासक ठरू शकते. सध्या यात अँटिरेट्रोव्हायरल उपचारपद्धतीचा वापर केला जातो. पण ते उपचार आयुष्यभर घ्यावे लागतात. नवी  उपचारपध्दती जास्त प्रभावी आहेत. आताची पद्धत सर्वच रुग्णांसाठी योग्य ठरेल असे नाही, असे मत गुप्ता यांनी व्यक्त केले. सीसीआर ५ या संग्राहकाच्या मदतीने एचआयव्ही विषाणू मानवी पेशीत प्रवेश करतो. पण फार थोडे लोक एचआयव्हीला प्रतिकार करू शकतात, कारण त्यांच्याकडे सीसीआर ५ संग्राहकाच्या दोन उत्परिवर्तित प्रती असतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button