breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

संभाजीराजे ‘अपक्ष’ भूमिकेवर ठाम, सेना नेत्यांचं प्लॅनिंग सुरु, राज्यसभेची माळ कुणाच्या गळ्यात?

मुंबई : शिवसेनेने (Shivsena) ऑफर देऊनही संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) आपल्या ‘अपक्ष’ भूमिकेवर ठाम असल्याने शिवसेना नेत्यांनी त्यांची पुढची रणनिती आखायला सुरुवात केली आहे. दुपारी सव्वा तीन वाजताच्या दरम्यान मराठवाड्यातील शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. राज्यसभेतील (Rajysabha Election 2022) सहाव्या जागेचा तिढा, मुख्यमंत्र्यांची मराठवाड्यातील सभा आणि औरंगाबादेतील पाणी प्रश्न अशा महत्त्वाच्या विषयावर आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे.

आज दुपारी १२ वाजता वर्षावर येऊन शिवबंधन बांधा, आम्ही तुमची उमेदवारी जाहीर करु, अशी ऑफर शिवसेनेने संभाजीराजे छत्रपतींना दिली होती. मात्र सेनेची ऑफर धुडकावून संभाजीराजेंनी सकाळीच मुंबईहून कोल्हापूरकडे प्रयाण केलं. आपण आपल्या अपक्ष भूमिकेवर ठाम असल्याचंच त्यांनी एकप्रकारे दाखवून दिलं. मात्र त्यांनी यासंदर्भातील कोणताही निरोप शिवसेनेला कळविला नाही. संभाजीराजेंनी भूमिका स्पष्ट न केल्याने शिवसेनेमध्येही संभ्रम आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना भवनात सेना नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडत आहे.

शिवसेना भवनातील बैठकीला चंद्रकांत खैरे, अर्जुन खोतकर आणि जयदत्त क्षीरसागर हे उपस्थित आहेत. संभाजीराजेंनी जर शिवसेनेच्या ऑफरला स्पष्ट शब्दात नकार दिला तर शिवसेना पक्ष ग्रामीण भागातील कट्टर शिवसैनिकाला उमेदवारी देईल, अशी भूमिका समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील राज्यसभेसाठीच्या शर्यतीतलं ते नाव कोणतं? राज्यसभेची माळ कुणाच्या गळ्यात पडू शकते?, अशा नावांवर आजच्या बैठकीत चर्चा होऊ शकते.

शिवसेनेच्या काही आमदारांचा संभाजीराजेंना पाठिंबा, मातोश्रीवर दबाव

शिवसेना राज्यसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही. कोणत्याही परिस्थितीत शिवसेना दोन उमेदवार निवडून आणणारच, असा निर्धार शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. मात्र, आता शिवसेनेचेच आमदार या भूमिकेवर किती ठाम राहतील, याविषयी शंका उपस्थित झाली आहे. कारण, शिवसेनेच्या गोटातील काही आमदारांचा संभाजीराजे यांच्या उमेदवारीला पाठिंबा असल्याचे समजते. या आमदारांनी मातोश्रीला धोक्याचा इशाराही दिला आहे.

संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभा उमेदवारी नाकारणे आपल्याला राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही, असे या आमदारांच्या गटाचे म्हणणे आहे. त्यामुळे १० जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत हे आमदार काय भूमिका घेतात, याकडे पाहावे लागेल. दुसऱ्या बाजूला संभाजीराजे म्हणून लढले आणि त्यांचा जर पराभव झाला तर छत्रपती घराण्यातील व्यक्तीचा पराभव केला म्हणून मराठा समाज नाराज होण्याचा धोका आहे. आगामी निवडणुकीत संबधित आमदार किंवा राजकीय पक्षांना याची किंमत मोजावी लागेल, असा मतप्रवाह शिवसेनेच्या काही आमदारांमध्ये आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button