breaking-newsमनोरंजन

‘मुळशी पॅटर्न’चे रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

चहा हा आपल्या जीवनातील एक महत्वपूर्ण घटक बनला आहे. चहाला काही ठराविक वेळ नसली, तरी वेळेला मात्र चहा लागतोच, असे अनेक चहाप्रेमी आपल्याला सर्रास भेटतात. आजवर आपण प्रेमाची परिभाषा मांडणारी अनेक गाणी ऐकली आणि बघितली असतील पण कधी वाफाळलेला कडक चहा आणि प्रेमाचा संगम अनुभवलाय? प्रविण तरडे लिखित, दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात चहाभोवती फिरणारी प्रेमी युगुलाची हटके अशी केमिस्ट्री ‘उन उन’ या गाण्यात बघायला मिळते.

अभिजित भोसले जेन्युईन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. यांची निर्मिती असलेल्या ‘मुळशी पॅटर्न’ मध्ये राष्ट्रीय पारितोषिक विजेता अभिनेता ओम भूतकर मुख्य भूमिकेत आहे, तर मालविका गायकवाड अभिनयात पदार्पण करत आहे. याच फ्रेश जोडीवर ‘उन उन’ हे अतिशय सुंदर असे रोमँटिक गाणे चित्रित करण्यात आले आहे.

वैशाली माडे आणि अवधूत गुप्ते यांच्या आवाजाचा साज चढलेल्या ‘उन उन’ गाण्याचे गीतकार प्रणित कुलकर्णी आहेत. तर नरेंद्र भिडे यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. ‘उन उन व्हटातून गुलाबी धांदल, वाफाळल्या पीरमाची मोगरी मलमल’’ असे शब्द असलेल्या गाण्यातून चहाच्या वाफेसोबत दोघांच्याही मनातील प्रेमाला उकळी फुटलेली दिसते. चहासारख्या रोजच्या जगण्यातील पेयाला प्रेमाच्या नजरेतून बघण्याचा हा पहिलाच प्रयोग म्हणावा लागेल. प्रेमाचा नवा आशय आणि सतत गुणगुणत रहावीशी वाटणारी चाल ही या गाण्याची खास वैशिष्ट्ये आहेत.

‘मुळशी पॅटर्न’ मधील यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या ‘आराररारा…..खतरनाक’ या गाण्याने सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला असून विविध म्युझिक अॅप्स बरोबरच मराठी संगीत वाहिन्यांवरहीहे गाणे ट्रेंडींग मध्ये आहे. आता आलेल्या या ‘उन उन व्हटातून’ या गाण्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिकच वाढली आहे.

‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण तरडे यांचे आहे. या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि किरण दगडे पाटील प्रॉडक्शन आहेत. अतिशय वेगळ्या कथेचा ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट येत्या २३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button