breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मुंबई काँग्रेसला आणखी घरघर!

सामूहिक नेतृत्वाच्या प्रस्तावानंतर नेत्यांची एकमेकांवर चिखलफेक

मुंबई : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवातून सावरण्याचा प्रयत्न होत असताना मिलिंद देवरा यांनी अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा, सामूहिक नेतृत्वाचा देवरा यांनी मांडलेला प्रस्ताव आणि त्यानंतर परस्परांवर सुरू झालेली चिखलफेक यातून मुंबई काँग्रेसमध्ये आणखी गोंधळ वाढला आहे. कोणाचा पायपूस कोणात नसल्याने त्याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसण्याची भीती काँग्रेस नेते व्यक्त करू लागले आहेत.

काँग्रेस पक्षाची स्थापना झालेल्या मुंबईत काँग्रेसला चांगला जनाधार होता. १९९५चा अपवाद वगळता मुंबईत २००९च्या निवडणुकीपर्यंत काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले होते. १९९९ मध्ये युतीची सत्ता जाण्यात मुंबईत काँग्रेसला मिळालेल्या चांगल्या जागा कारणीभूत ठरल्या होत्या. १९९९, २००४ आणि २००९ मध्ये राज्यात काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळण्यात मुंबई आणि विदर्भाने दिलेली चांगली साथ महत्त्वाची ठरली होती. २०१४ लोकसभा निवडणुकीपासून मुंबईत काँग्रेसची पीछेहाट होत गेली. लोकसभेत भोपळा फोडता आला नाही. विधानसभेत फक्त पाच आमदार निवडून आले तर महानगरपालिका निवडणुकीत जेमतेम ३१ नगरसेवक निवडून आले होते. एप्रिल महिन्याच्या लोकसभा निवडणुकीतही गतवेळप्रमाणे  सहाही जागा काँग्रेस-राष्ट्रवादीने मोठय़ा मताधिक्याने गमावल्या. आता विधानसभा निवडणुकीत तग धरण्याचे आव्हान असतानाच मुंबई काँग्रेसमधील पक्षांतर्गत वाद उफाळून आला.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल करण्यात आले. संजय निरुपम यांच्या जागी मिलिंद देवरा यांची नियुक्ती करण्यात आली. देवरा यांनी निरुपम यांच्या विरोधात मोहीम राबवून अध्यक्षपद मिळविले. वास्तविक देवरा यांच्या नियुक्तीची वेळ चुकली होती. देवरा हे स्वत:च उमेदवार होते व त्यामुळे त्यांना मुंबईत अन्यत्र लक्ष घालता आले नाही. लोकसभा निवडणुकीत पक्षाचा पार धुव्वा उडाला. या पराभवातून सावरत असतानाच देवरा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तो स्वीकारला जाईल की नाही याबाबत दिल्लीतच निर्णय होईल. पण मुंबई काँग्रेसमध्ये तीन ज्येष्ठ नेत्यांचे सामूहिक नेतृत्व असावे, असा प्रस्ताव देवरा यांनी मांडला आहे. एका अध्यक्षाला काम करताना किती अडचणी येतात हे सर्वासमोर असताना तीन नेते पक्ष कसा चालविणार, याचा देवरा यांनी विचार केला नसावा.

देवरा यांच्या प्रस्तावावर निरुपम यांनी जाहीर टीका करत तीन जणांच्या सामूहिक नेतृत्वामुळे पक्ष आणखी मागे पडेल, असा इशारा दिला. या टिकेला आमदार भाई जगताप यांनी प्रत्युत्तर दिले. या गोंधळात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात निर्णायकी अवस्था निर्माण झाल्याने मुंबईतील काँग्रेसचे इच्छुक उमेदवार आणि पदाधिकारी अस्वस्थ आहेत. इतिहासातून धडा न घेतल्याने २०१४ प्रमाणेच मुंबईत काँग्रेसचा पुन्हा धुव्वा उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबईत काँग्रेसची पीछेहाट का झाली?

मुंबईत शिवसेनेने मराठीचा मुद्दा मांडताच बिगर मराठी भाषकांना काँग्रेसचा आधार होता. उत्तर भारतीय, अन्य बिगर मराठी, मुस्लीम मते काँग्रेसला हमखास मिळत असत. यातून काँग्रेसचे विजयाचे गणित जुळायचे. २०१४ पासून उत्तर भारतीय, गुजराती एकगठ्ठा मते भाजपकडे वळली. यातून काँग्रेसची मते घटली. पक्षांतर्गत गटबाजी, मतदारांनी फिरवलेली पाठ यातून मुंबईत काँग्रेसची ताकद कमी होत गेली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button