breaking-newsमुंबई

मुंबईतून दोन लाखांच्या ‘ई-सिगारेट’ जप्त

  • नऊ विक्रेत्यांवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई

मुंबई : देशभरात बंदी असलेल्या ई सिगारेटचा मुंबईत सर्रास वापर होत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणी मोहिमेतून उघडकीस आले आहे. मुंबईतील गोरेगाव, वांद्रे, अंधेरी भागांतील नऊ विक्रेते आणि वितरकांकडून जवळपास दोन लाख रुपयांचा ई सिगारेटचा साठा प्रशासनाने जप्त केला आहे.

मुंबईत पान स्टॉल, किरकोळ आणि घाऊक ७४ विक्रेत्यांच्या तपासण्या प्रशासनाने केल्या. या मोहिमेमध्ये वांद्रे, अंधेरी, गोरेगाव भागांमध्ये नऊ विक्रेत्यांकडे ई सिगारेट सापडल्या. वांद्रेच्या हिल रोड येथील ईझी स्मोक या विक्रेत्याकडून ज्यूल ब्रॅण्डच्या ई सिगारेटचा एक लाखांचा माल जप्त केला आहे. ज्यूल बॅ्रण्डची ई सिगारेट ही अमेरिका आणि इंग्लंडमध्ये विक्रीसाठी आहे. तसेच गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड या संस्थेकडून १ लाख २३ हजारांचा ई सिगारेटचा माल जप्त केला आहे. वर्ज वोरा वेप्स नावाच्या ई सिगारेट संस्थेने आयात केली असून यावर निकोटिनचे प्रमाण आणि घटक नमूद केलेले नाहीत.

ई सिगारेटसह ई धूम्रपान पदार्थाची विक्री ऑनलाइनद्वारे होत असल्याचे निदर्शनास आल्याने अशा विक्रेत्यांचाही शोध घेणे सुरू आहे. तसेच ज्या संकेतस्थळामार्फत विक्री किंवा वितरण केले जात आहे. त्यांना राज्यभरात बंदी घालण्याबाबत माहिती तंत्रज्ञान विभागालाही कळविले असल्याचे राज्य अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी सांगितले.

‘निकोटिन रिप्लेसमेंट थेरपी’चा दावा फसवा

सिगारेट ओढण्याचा आनंद आणि दुष्परिणाम कमी या गैरसमजातून सिगारेटऐवजी ई सिगारेटकडे वळण्याकडे हल्ली तरुणांचा कल वाढत आहे. ई सिगारेट हा निकोटिन रिप्लेसमेंट थेरपीअंतर्गत असलेले औषध, असा दावा चुकीचा असल्याचे अनेक संशोधन अभ्यासांतून सिद्ध झाले आहे. ई सिगारेटमधील ई ज्यूसमुळे सीओपीडी, ब्रॉन्कायटिस यांसारखे श्वसनाचे आजार जडण्याची शक्यता असते, असे झेन मल्टिस्पेशलिटी रुग्णालयाचे श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. अरविंद काटे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button