breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईच्या सिटी सेंटरमध्ये लागलेली आग दोन दिवसांनंतरही धुमसती

मुंबई – मुंबईतील प्रसिद्धध सिटी सेंटर मॉलला गुरुवारी रात्री आग लागली होती. मात्र, ही आग अद्यापही शमली नसून विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत मॉलचे दोन मजले पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. तर, दुसऱ्या-तिसऱ्या मजल्यावरील सर्व दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. तब्बल पाच तासांहून अधिक काळ प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही आगीवर नियंत्रण मिळत नसल्यामुळे अखेर अग्निशमन दलाने ‘ब्रिगेड कॉल’ची घोषणा केली होती. आगीचे रौद्ररूप आणि धुमसणारा धूर यांमुळे अग्निशमनात अनेक अडथळे येत होते. आगीवर नियंत्रण मिळवताना एक उपअग्निशमन अधिकारी आणि चार जवान जखमी झाले. घटनास्थली काल अस्लम शेख आणि त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली.

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर यासंबंधी माहिती देताना आपण प्रत्येक क्षणाचे अपडेट घेत असल्याचं सांगितलं आहे. “सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून आपले शूर जवान तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत,” असं म्हटलं आहे. आग विझवण्यासाठी रोबोटचा यशस्वीपणे वापर करण्यात आल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली आहे.

कशी लागली आग?

मुंबई सेंट्रल बेस्ट बस आगारासमोरील सिटी सेंटर मॉलमधील दुसऱ्यामजल्यावर गुरुवारी रात्री ८.५३ च्या सुमारास एका दुकानातील मोबाइलच्या बॅटरीने पेट घेतला आणि काही क्षणात हा संपूर्ण मजला आगीच्या भक्ष्यस्थानी पडला, असा निष्कर्ष प्राथमिक पाहणीतून काढण्यात आला आहे. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी रवाना झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. मात्र मॉलमधील मोबाइल, लॅपटॉप आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानांमध्ये आगीचा भडका उडत होता. दुसऱ्यामजल्यावरील आग तिसऱ्यामजल्यावर पोहोचली आणि आगीने अक्राळविक्राळ रूप धारण केले. धुराचे साम्राज्य अवघ्या मॉलमध्ये पसरू लागले होते. अखेर गुरुवारी मध्यरात्री २.४१ च्या सुमारास अग्निशमन दलाने ‘ब्रिगेड कॉल’ जाहीर केला.

अग्निशमन दलाची अधिक कुमक मागविली

क्षणाक्षणाला आगीचा भडका वाढू लागल्यामुळे अग्निशमन दलाची अधिक कुमक मागविण्यात आली. अग्निशमन दलाचे २४ बंब, १७ जम्बो टँकर, सहा पाण्याचे टँकर यांसह ५० अग्निविमोचन वाहने घटनास्थळी दाखल झाली होती. प्रमुख अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांच्यासह एकूण २५० अधिकारी आणि अग्निशामक आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नशील होते. अग्निशमन दलाच्या जवानांप्रमाणेच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमनात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी पोलीस तैनात होते.

३५०० रहिवाशांची सुटका

सिटी सेंटर मॉलजवळच ‘ऑर्किड एन्क्लेव्ह’ ही ५५ मजली इमारत आहे. मॉलला लागलेली आग भडकू लागताच मोठ्या प्रमाणावर धुराचे लोळ उठू लागले. खबरदारी म्हणून पोलिसांनी ‘ऑर्किड एन्क्लेव्ह’मधील तब्बल तीन हजार ५०० रहिवाशांना सुरक्षितपणे इमारतीतून खाली उतरविले. काही रहिवासी आपल्या नातेवाईकांच्या घरी निघून गेले. तर काही रहिवाशांची जवळच्या मैदानात व्यवस्था करण्यात आली होती.

एक अधिकारी, चार जवान जखमी

सिटी सेंटर मॉलला लागलेली आग विझविताना अग्निशमन दलातील उपअग्निशमन अधिकारी गिरकर (५०), अग्निशामक रवींद्र प्रभाकर चौगुले (५३) जखमी झाले, तर शामराव बंजारा (३४), भाऊसाहेब बदाणे (२६), संदीप शिर्के यांना धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे या दोघांनाही तात्काळ जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button