माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही कोरोनाची लागण
चंद्रपूर – राज्यातील कोरोनाचा विळखा दिवसागणिक अधिकच घट्ट होत आहे. भाजपा नेते आणि राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी मागील काही दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना आपापली चाचणी करण्याचे व काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे.
‘माझ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी स्वत:ला आयसोलेट करुन घेतले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची कोरोना चाचणी करुन घ्यावी किंवा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेत क्वारंटाईन व्हावे’, असे ट्विट मुनगंटीवार यांनी केले आहे.
सुधीर मुनगंटीवार यांच्या कौटुंबिक सहकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे त्यांनी दोन दिवसीय विधीमंडळ अधिवेशनला जाणे टाळले होते. त्यानंतर त्यांना खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी केली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण शोधण्यासाठी मुनगंटीवार यांच्या अन्य काही चाचण्या करुन घेतल्या जात आहेत. सध्या तरी त्यांच्यावर घरीच उपचार केले जात असल्याची माहिती कार्यालयाने दिली आहे. तसेच त्यांच्या घरातील अन्य सदस्यांचीदेखील कोरोना चाचणी केली जाणार आहे.