breaking-newsमनोरंजन

‘माऊली’ नाराज नाही करणार

‘लय भारी’ या सुपारहित चित्रपटानंतर चार वर्षानी बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख पुन्हा एकदा मराठीत ‘माऊली’ बनून आला आहे. चित्रपटाचे नाव ‘माऊली’ असले तरी हा ‘लय भारी’चा सिक्वेल नाही, मात्र कथा, पटकथा, संवाद आणि गाणी त्याच तोडीचे आहेत, यामुळे आदित्य सरपोतदार दिग्दर्शित फुल्ल अॅक्शनपट असलेला हा ‘माऊली’ प्रेक्षकांना निश्चितच नाराज नाही करणार असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
‘माऊली’ ही कथा महाराष्ट्रातल्या कापुरगाव येथे घडते. या गावात माऊली सर्जेराव देशमुख  (रितेश देशमुख) या पोलीस इन्स्पेक्टर म्हणून येतो. त्या गावात नाना (जितेंद्र जोशी) या गावगुंडाने आपले साम्राज्य निर्माण केले आहे, गावातल्या लोकांना तो प्रचंड त्रास देत असतो. लोकांच्या जमिनी बळकावणे, लोकांना मारणे ही त्याची नित्याची कामे असतात. माऊली गावात आल्यानंतर तो त्याला देखील त्रास देतो. या सगळ्याचा सामना माऊली कसा करतो? नानाचे साम्राज्य खालसा होते का? हे जाणून घेण्यासाठी ‘माऊली’ चित्रपटगृहात जाउन बघायला हवा.
आदित्य सरपोतदार यांनी यापूर्वी ‘फास्टर फेणे’, ‘क्लासमेट्स’ असे उत्तम चित्रपट दिले आहेत, क्षितीज पटवर्धन लिखीत या कथेला पुरेपूर  न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ‘माऊली’ च्या कथेचा प्लॉट चांगला आहे, माऊली आणि नाना या दोन्ही व्याक्तीरेखांच्या वाट्याला दमदार संवाद आहेत मात्र पटकथेत कमतरता असल्याने चित्रपट काहीसा संथ झाला आहे. सुरुवातीला पात्रांची ओळख करून देण्यातही बराच वेळ घालवल्याचे जाणवते.
कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायचे तर अभिनेतारितेश देशमुख आणि जितेंद्र जोशी यांच्यातील जुगलबंदीमस्त रंगली आहे. रितेश देशमुखने साकारलेला माऊलीउत्तम झाला आहे. पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत त्याने आपली छाप सोडली आहे. रितेशने ही भूमिका अगदी सहज साकारली आहेच शिवाय त्याचा रांगडा टच प्रेक्षकांना भावतो आणि चित्रपटात रंगत आणतो. जितेंद्र जोशीने उभा केलेला नाना अगदी रिअल खलनायक वाटतो, त्याचा लुक, स्टाईल यावर चान काम झाले आहे.सिद्धार्थ जाधवने त्याच्या वाट्याला आलेला बहुरूपी उत्तम उभा करत आपली कामगिरी चोख बजावली आहे. सैयमी खेर यापूर्वी ‘मिर्जीया’ या हिंदी चित्रपटात दिसली होती, तिचा हा मराठीतील पहिलाच चित्रपट तिची रेणुका लक्षात राहणारी आहे. इतर कलाकारांची कामेही चांगली झाली आहेत.
अजय-अतुलचे संगीत मस्त झाले आहे, रितेश आणि जिनेलिया देशमुखवर  चित्रित झालेलं ‘धुऊन टाक’ हे गाणं सुंदर आहे. ‘माझी माय पंढरी’ सुद्धा चांगले झाले आहे. चित्रपटाचे पार्श्वसंगीत उत्तम झाले आहे. अमलेंदू चौधरी यांचे कॅमेरावर्क उत्तम आहे.
‘माऊली’ बद्दल थोडक्यात सांगायचे तर दाक्षिणात्य चित्रपट किंवा बॉलीवूड मध्ये सिंघम, दबंग या सारख्या चित्रपटांची एक विशिष्ट स्टाईल लोकप्रिय आहे. पोलिसाची ताकद, चांगुलपणा, कार्यनिष्ठा याच्या जोडीला धारदार संवाद,  दमदार ऍक्शन असा संपूर्णमसाला ‘लय भारी’ नंतर पुन्हा एकदा मराठीत ‘माऊली’ या चित्रपटाच्या निमित्ताने अनुभवता येतो. यामुळे या ‘माऊली’ ला एकदा भेटायला हरकत नाही.
चित्रपट – माऊली
निर्माती – जिनिलीया देशमुख
दिग्दर्शक – आदित्य सरपोतदार
संगीत – अजय – अतुल
कलाकार – रितेश देशमुख, सैयमी खेर, जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव, गिरीजा ओक, श्रीकांत यादव,
रेटिंग – ***
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button