breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

महाविकास आघाडी सरकारच्या काळात आदिवासी योजना ठप्प!

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका
भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी बैठक

पिंपरी । प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारच्या काळात आदिवासी समाजाच्या योजना पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. भाजपाच्या काळात खावटीचे कर्ज रद्द केले होते. सुमारे १७५ कोटी रुपयांचे आदिवासी बांधवांवरील कर्ज आम्ही माफ केले होते. पण, आताच्या सरकारचे खावटीबाबत धोरण काय आहे? आदिवासींच्या खात्यात ४ हजार रुपये जमा करण्याची योजना असताना, सरकारने वस्तू खरेदी करुन आदिवासी बांधवांना देवू, अशी भूमिका घेतली. महाविकास आघाडीला खरेदीमध्ये स्वारस्य आहे. चुकीचा माल खरेदी करु आणि मलिदा लाटू, अशी भूमिका सरकारची आहे, अशी घणाघाती टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पिंपरी-चिंचवड शहर भाजपा अनुसूचित जमाती आदिवासी मोर्चातर्फे शुक्रवारी प्रदेश पदाधिकारी कार्यसमिती बैठक आणि मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी श्री. फडणवीस बोलत होते.
यावेळी राष्ट्रीय सचिव ओमप्रकाश दुर्वे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, संघटनमंत्री विजय पुराणिक, महामंत्री श्रीकांत भारतीय, अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेशाध्यक्ष प्रा. अशोक उईके, महापौर उषा ढोरे, माजी मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले की, आदिवासी समाजाला कालांतराने शिक्षणापासून वंचित ठेवून मागासलेपणा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कुपोषण-मागासलेपणामुळे प्रचंड मोठा सांस्कृतिक वारसा असतानाही आदिवासी समाज दुर्लक्षित राहिला. राज्यात भाजपाचे सरकार असताना आदिवसी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी ठोस कार्यक्रम हाती घेतला आहे.
दरम्यान, भगवान बिसरा मुंडा जन्मदिवस आदिवासी दिन घोषित करण्याबाबत राज्य सरकारला विनंती करण्यात येणार आहे. तसा ठराव कार्यकारिणीमध्ये पारित करण्यात आला आहे.

शहराध्यक्ष लांडगेच्या अनुपस्थितीत मेळावा यशस्वी…
भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचा प्रदेश कार्यकरिणी मेळावा पिंपरी-चिंचवडमध्ये झाला. या कार्यक्रमाला शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे उपस्थित नव्हते. मात्र, ‘टीम लांडगे’ सकाळीपासून कार्यक्रम स्थळी सक्रिय दिसत होती. लांडगे यांच्या कार्यालयाचे प्रतिनिधी यांच्यासह सौ. पूजा लांडगे, बंधू कार्तिक लांडगे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे शहर कार्यकारिणीनेही उत्साहाने कार्यक्रम यशस्वी केला, असे चित्र पहायला मिळाले.

भाजपामुळे आदिवासी मुलांना शिक्षणाची संधी…
प्रत्येक वर्षी आदिवासी समाजातील २५ हजार मुले शहरातील इंग्रजी शाळांमध्ये शिक्षण घेवू शकतील, अशी व्यवस्था भाजपा सरकारच्या काळात करण्यात आली आहे. आदिवासी मुलांसाठी सेंट्रलाईज किचन, पंडित दिनदियाळ उपाध्यक्ष स्वयं योजनेतून गणवेश, शैक्षिणिक साहित्य, राहण्याची व्यवस्था आदीसाठी मदत, पेसा ग्रामपंचायत निर्णयामुळे आदिवासी गावांचा विकास, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी अनेक योजना भाजपाने सुरू केल्या आहेत. आदिवासी बांधवांना मालकी हक्काचे पट्टे आहेत. त्यामध्ये दुप्पट पट्टे समाजाला दिले आहेत. तसेच, पट्टेधारक आदिवासी यांना शेतकऱ्यांची योजना लागू केली, अशी भूमिका विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी मांडली. आदिवासी बांधवांच्या हक्कांसाठी आगामी काळात प्रसंगी रस्त्यावर उतरुन भाजपा आंदोलन करेल, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button