breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्राच्या खासदारांचा दिल्लीत दबदबा ; सहा खासदारांना ‘संसदरत्न’ पुरस्कार

मुंबई – महाराष्ट्रातील खासदारांचा संसदेत दबदबा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रातील सहा खासदारांना चेन्नईतील प्राईम पॉईंट फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा संसदरत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे. मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, बारामतीच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, हिंगोलीचे काँग्रेसचे खासदार राजीव सातव, कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक, नंदुरबारच्या भाजपाच्या खासदार हिना गावित यांना लोकसभेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल व काँग्रेस नेत्या रजनीताई पाटील यांना राज्यसभेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल देण्यात आला.

चेन्नईतील राजभवन येथे तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते आणि माजी निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमुर्ती, प्राईम पॉईंट फाऊंडेशनचे संस्थापक के. श्रीनिवासन यांच्या उपस्थितीत खासदारांना संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. आयआयटी चेन्नई आणि प्राईम पॉईंट फाऊंडेशन- प्रिसेन्स ई मॅगेझिन यांच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन मेघवाल, शिवसेनेचे नेते खासदार आनंदराव अडसूळ यांच्या समितीने उत्कृष्ठ कामगिरी करणा-या खासदारांची निवड केली आहे.

खासदाराची संसदेतील कामगिरी त्यांचा विविध चर्चांमधील सहभाग, उपस्थित केलेल्या प्रश्नोत्तरांची संख्या, खासगी सदस्य विधेयक संख्या, सभागृहातील उपस्थिती, मतदार संघात केलेली विकास कामे यासंदर्भात पीआरएस इंडियाने दिलेल्या आकडेवारीवरुन कामगिरीचा आढावा घेऊन आणि लोकसभा सचिवालयामार्फत पुरवलेल्या माहितीवरुन याचे मुल्यांकन निवड समिती मार्फत करण्यात येते. त्यानुसार आयआयटी चेन्नई व प्राईम पाँईट फाऊंडेशनच्या वतीने ‘संसदरत्न’ हा पुरस्कार दिला जातो.

शिवसेनेचे मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांना सलग पाचव्यांदा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 16 व्या लोकसभेच्या गेल्या 5 वर्षातील कामगिरीचा आढावा घेण्यात आला. यामध्ये बारणे यांनी 1076 प्रश्न उपस्थित केले. 289 वेळा प्रत्यक्ष चर्चेतील सहभाग घेतला. 93 % उपस्थिती दर्शविली तर 20 खाजगी विधेयके मांडली. त्याचबरोबर विविध समितींच्या बैठकीमध्ये सर्वाधिक उपस्थिती आणि स्थानिक खासदार विकास निधीचा सर्वाधिक वापर करून विविध विकासकामे पूर्णत्वास नेली. या कामगिरीबद्दल खासदार बारणे यांना सलग पाचव्या वर्षी पुरस्कार मिळाला आहे. बारणे सलग पाच वर्ष पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रतील एकमेव खासदार आहेत.

काँग्रेसचे हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांना सलग चौथ्यांदा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. राष्ट्रवादीचे कोल्हापूर लोकसभेचे खासदार धनंजय महाडिक यांना सलग तिसर्‍या वर्षी संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. सुप्रिया सुळे यांनाही सलग तिस-यांदा हा पुरस्कार मिळाला आहे. नंदुरबारच्या भाजप खासदार हिना गावित आणि मराठवाड्यातील राज्यसभेतील माजी खासदार रजनीताई पाटील यांनाही संसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. देशातील आणखी सहा खासदारांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मात्र, एकून 12 पैकी सहा खासदार महाराष्ट्रातील असल्याने मराठी खासदारांनी संसदेत दबदबा राखल्याचे दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button