breaking-newsपुणेमहाराष्ट्र

महापालिकेची सुरक्षा ‘आंधळी’

पुणे – स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहर चकाचक करायला निघालेल्या महापालिकेच्या स्वत:च्या इमारतीच्या बाबतीत मात्र दिव्याखाली अंधार दिसतो. महापालिका भवनातील सुरक्षाविषयक तांत्रिक सेवांचे तीनतेरा वाजले असून, गेल्या अनेक महिन्यांपासून महापालिका भवनात प्रवेश करण्याच्या प्रवेशद्वारावरचे सीसीटीव्हीच पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे शहराचा कारभार सांभाळणाऱ्या संस्थेची सुरक्षा व्यवस्था “आंधळी’ असल्याचे चित्र आहे.

 

विद्युत विभागाचा कार्यभार ताब्यात घेऊन एक महिना झाला आहे. सीसीटीव्ही बंद असल्याबाबतची तक्रार आपल्याकडे आली नाही. तरीही सोमवारी याबाबतची विचारणा करून बिघडलेली यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल.
-श्रीनिवास कंदुल, विद्युत विभागप्रमुख, मनपा.

महापालिका भवनात रोज हजारो नागरिकांची जा-ये सुरू असते. महापौरांसह अनेक महत्त्वाचे पदाधिकारी आणि अधिकारी यांची कार्यालये या भवनात आहेत. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी महापालिकेने सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. तसेच महापालिका भवनाच्या आवारात आणि त्याशेजारी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. कामानिमित्त आलेल्या नागरिकांना पार्किंग स्पेसमध्ये वाहने पार्क करावे लागते. अनेकदा वाहन आतच आणणार असा होरा वाहनचालकाचा असतो आणि सुरक्षारक्षक त्यांना मज्जाव करत असतो. अशावेळी वादावादी होण्याचे प्रकारही महापालिका भवनाच्या प्रवेशद्वारावर नेहमी होत असतात. यामध्ये माननीयांच्या कार्यकर्त्यांचा आवाज सर्वात जास्त असतो.

याशिवाय शहरातील विविध नागरी प्रश्‍नांसंबंधिचे मोर्चे महापालिका भवनासमोर येत असतात. अशावेळी प्रवेशद्वार बंद केले, तरी त्यावर चढून येण्याची करामतही अनेक कार्यकर्ते करत असतात. त्यामुळे सुरक्षा रक्षकांना “अलर्ट’ रहावेच लागते. यामध्ये सुरक्षा रक्षकांनी कसूर केल्यास त्यांनाच वरिष्ठ आणि माननीयांच्या रोषाला सामोरे जावे लागते.

शनिवारी झालेला प्रकारही असाच होता. गणवेश नसलेल्या व्यक्तीने पोलीस असल्याचे सांगितले. त्यावरून सुरक्षा रक्षकांनी त्याला ओळखपत्र मागितले. ओळखपत्र द्यायला नकार दिल्याने हा वाद पेटला. या प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही बंद असल्याने त्याचे फुटेज तपास करण्यासाठी मिळाले नाही. परंतु वारंवार अशा घटना घडत असल्या तर एखादा जिवावर बेतणारा प्रसंगही याठिकाणी घडू शकतो.

…म्हणून समोर आला प्रकार
शनिवारी महापालिका भवनात सुरक्षारक्षक आणि पोलीस कर्मचारी यांच्यामध्ये वादावादी झाली. हा प्रकार महापालिका भवनाच्या “इन’ गेटमध्येच घडला. नेमका प्रकार काय झाला? याविषयी जाणून घेण्यासाठी महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांच्या कक्षात बसवलेल्या सीसीटीव्ही मॉनिटरींग कक्षात पाहिले असता, प्रवेश द्वारावरील सीसीटीव्हीच बंद असल्याचे सांगण्यात आले. याविषयी संबंधित विभागाकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button