breaking-newsपुणेमहाराष्ट्र

घाई करा…हापूसचा गोडवा आणखी आठवडाभरच

  • हंगाम संपला, आवकही थांबली 

  • तयार माल काही दिवसच उपलब्ध

  •  कर्नाटक हापूसचा हंगामही अंतिम टप्प्यात

पुणे – गेले काही दिवस आपल्या अवीट चवीने पुणेकरांना गोडवा लावणाऱ्या रत्नागिरी हापूसचा हंगाम संपला आहे. त्यामुळे आवक थांबली आहे. व्यापाऱ्यांकडे शिल्लक असलेल्या मालाची विक्री सुरू आहे. पुढील एक आठवडा ग्राहकांना या आंब्याची चव चाखता येणार आहे.

दरम्यान, कर्नाटक हापूसचाही हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. तरीही बाजारात मोठी आवक होत आहे. पुढील 10 ते 15 दिवस हा हंगाम चालेल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. मागील तीन महिन्यांपासून रत्नागिरीचा हंगाम सुरू होता. ओखी वादळाचा फटका बसल्यामुळे यावर्षी सुरूवातील आंब्याची आवक कमी होत होती. त्यामुळे या हंगामात रत्नागिरी सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेरच जास्त काळ राहिला. त्यानंतर एकदम आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली. तेव्हापासून भाव घसरले होते.

मागील आठवड्यात रत्नागिरीची हापूसची तुरळक आवक होती. ती आता पूर्णपणे थांबली आहे. तरीही मागील आठवड्यात खरेदी केलेला रत्नागिरी हापूस तयार स्वरूपात बाजारात उपलब्ध आहे. उपलब्ध असणाऱ्या आंब्यांमध्ये खराब माल निघण्याचे प्रमाणही मोठे आहे. 
– अरविंद मोरे, व्यापारी, रत्नागिरी हापूस.

 

कर्नाटक हापूसची चव आणखी काही दिवस चाखता येणार आहे. कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. या काळात आंब्याची आवक कमी झाली. त्यानंतर आवक वाढली आहे. आताही आंब्याची चांगली आवक होत आहे. रविवारी 20 हजार पेट्यांची आवक झाली. 
– रोहन उरसळ, व्यापारी, कर्नाटक हापूस.

आंब्याचे भाव (रुपयांत): 
रत्नागिरी हापूस तयार – (4 ते 8 डझन) 700 ते 1,200 
कर्नाटक हापूस कच्चा (4 डझन) 400-600. 
पायरी कच्चा (4 डझन) 300-400. 
लालबाग (1 किलो) 15- 20. 
बदाम (1 किलो) 15-20.

 

गावरान हापूसची आवक वाढली, भावही आवाक्‍यात 
गावरान हापूस आंब्याची आवक वाढली आहे. त्यास मागणीही चांगली आहे. रविवारी हवेली आणि मुळशी तालुक्‍यातून 100 क्रेट आंब्यांची आवक झाली. प्रत्येक क्रेटमध्ये 7 डझन आंबे असतात. प्रति डझनास 200 रुपये भाव मिळत आहे. हा आंबा नैसर्गिकरित्या पिकविलेला असतो. त्यामुळे नागरिक आवर्जून खरेदी करतात. येत्या आठवड्यात ही आवक आणखी वाढेल, असा अंदाज व्यापारी तात्या कोंडे यांनी व्यक्त केला. हा हंगाम 30 जूनपर्यंत राहील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button