breaking-newsपिंपरी / चिंचवड

महापालिका महासभा, स्थायीत उपसूचना दिल्यास कारवाई; चंद्रकांत पाटील

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाने उपसूचनांच्या माध्यमातून महापालिकेची चालविलेली लूट थांबविण्यासाठी आता त्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सरसावले आहेत. महापालिकेच्या सर्वसाधारण सभा अथवा स्थायी समितीच्या सभेत उपसूचना दिल्यास कडक कारवाई करण्याचा जाहीर इशाराच चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.

अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर चंद्रकांत पाटील हे प्रथमच शहरात आले होते. या वेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर संवाद साधला. महापौर माई ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, उपमहापौर तुषार हिंगे, सत्ताधारी पक्षनेते नामदेव ढाके, अण्णा भाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे व इतर पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जानेवारी महिन्यात उपसूचनांबाबत ठोस भूमिका घेत ज्या ठिकाणी भाजपाची सत्ता आहे त्या ठिकाणी योग्य पद्धतीने अजेंड्यावर विषय आणावा, उपसूचना देऊ नयेत, अशी सूचना महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना केली होती. मात्र, यातून कोणताही बोध न घेता पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी असलेल्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक महापालिका सभेत उपसूचनांचा पाऊस पाडण्याचे काम अत्यंत प्रामाणिकपणे बजाविले होते. कोणतीही तमा न बाळगता मोठ-मोठे विषय उपसूचनेच्या माध्यमातून मंजूर करून घेत महापालिकेची लूट चालविली होती.

याबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना पाटील यांनी आपली भूमिका पुन्हा अधोरेखीत करताना सत्ताधाऱ्यांना इशारा दिला. या वेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, उपसूचनांबाबत माहिती घेतली जाईल. यापुढे उपसूचनांची गांभीर्याने दखल घेत कोणत्याही सभेत उपसूचना दिल्यास संबंधितांवर कडक कारवाई पक्षाकडून केली जाईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. पाटील यांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर स्थानिक पदाधिकारी आपली भूमिका बदलणार की पाटलांच्या आदेशाला “वाटाण्याच्या अक्षता’ लावणार हे आठवडाभरातच स्पष्ट होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button