breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका पार्किंग ठेकेदारांच्या मुदती संपल्या, अजूनही वसुली सुरुच

भूमि व जिंदगीच्या अधिका-यांचे दुर्लक्ष, ‘आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय’अशी अवस्था

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात भूमी व जिंदगी विभागाने विविध ठिकाणी शेकडो आरक्षित जागा पार्किंग करण्यासाठी आरक्षित ठेवल्या आहेत. त्यातील पालिकेच्या मिळतीवर आणि काही मोकळ्या जागेवर पार्किंग धोरण राबवून ठेकेदार नियुक्त केलेले आहेत. सध्यस्थितीला त्या ठेकेदाराच्या मुदती संपलेल्या आहेत. प्रत्यक्षात अजूनही पार्किंगच्या नावाखाली पावत्या फाडण्याचे काम इमानेइतबारे हे ठेकेदार करु लागले असून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे. त्यामुळे ‘आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय’अशी अवस्था झाल्याचे दिसत आहे.

महापालिकेच्या भूमि व जिंदगी विभागाकडून शहरातील मिळकतीचे संरक्षण करण्यात येते. तर मोकळ्या आरक्षित जागा भूसंपादन झाल्यानंतर या विभागाकडे हस्तांतर करण्यात आलेल्या आहेत. त्यातील महापालिकेच्या शाळा, दवाखाने, हाॅस्पीटले, भाजी मंडई, प्रभागस्तरीय इमारती, नाट्यगृहे याशिवाय मोकळ्या जागेवर पार्किंगचे धोरण राबविलेले आहे. त्यानूसार महापालिकेने शहरात 23 ठिकाणी पार्किंगच्या जागा राखीव आहेत. त्या जागेवर पार्किंग करण्यासाठी ठेकेदार नियुक्ती केलेली आहे.

त्यानूसार महापालिकेच्या निगडी सेक्टर क्रमांक 23 मधील वाहतूकनगरी वाहनतळ या जागेचे पार्किंगसाठी नियुक्त केलेल्या ठेकेदाराची मुदत संपलेली आहे. प्रत्यक्षात त्या जागेवरुन आजही पार्किंगची वसुली जोरदार सुरु आहे. तेथील पार्किंग राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांच्या मुलांच्या ताब्यात आहे. त्यांनी वाहनतळावर आलेल्या वाहनाच्या पावत्या फाडून वसुली सुरु आहे.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात देखील राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांच्या वरदहस्ताने गोरगरीब रुग्णांकडून पाच ते दहा रुपये पावत्या सक्तीने फाडल्या जात आहेत. तीन ते चार कर्मचा-यानी टू व्हीलर आणि फोर व्हीलर वाहनाच्या पावत्या फाडून स्वताःची झोळी भरत आहेत. त्या पार्किंगची देखील मुदत संपलेली आहे.

तसेच पिंपरीतील क्रोमा हाॅस्पीटल शेजारी पार्किंगवर भाजपच्या नगरसेविकेच्या आर्शिवादाने पार्किंगचा धंदा मांडला आहे. वाहनतळावर वाहने पार्क केल्यानंतर पावती फाडल्याशिवाय गाडी बाहेर जावूच दिली जात नाही. तसेच निगडीच्या दुर्गा देवी टेकडीलगत अप्पू घर परिसरात देखील पार्किंगचा नावाखाली सर्वसामान्य नागरिकांची लूट सुरु आहे. रहाटणी तेथील स्पाॅट 18 या इमारती खालील बीआरटीएस वाहनतळावर देखील वसुली जोरात सुरु आहे.

दरम्यान, महापालिकेच्या भूमि व जिंदगी विभागाच्या सहाय्यक आयुक्त, प्रशासन अधिकारी, तेथील प्रभाग अधिका-यांनी याबाबत सर्व कल्पना असूनही त्यांनी डोळेझाक केल्याचे दिसत आहे. सदर पार्किंगची बेकायदेशीर वसुली सुरु असतानाही ती थांबवण्याचे धाडक महापालिकेचे अधिकारी करीत नाहीत. प्रत्यक्षात सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे. याकडे महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, पारदर्शकतेच्या गप्पा मारणारे सत्ताधारी भाजप पदाधिका-यांचे देखील दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे सर्वपक्षीय पदाधिकारी, नगरसेवकांनी पालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचा सपाटा लावल्याचे दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button