महापालिका कर्मचाऱ्यांना धन्वंतरी नव्हे, तर आरोग्य विमा योजना लागू होणार
पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांसाठीची धन्वंतरी योजना बंद करण्यात येईल, तर आरोग्य विमा योजना सुरू करण्यासाठी विमा कंपन्यांशी प्रस्तावावर चर्चा सुरू आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आस्थापनेवरील कर्मचायांसाठी वैद्यकीय प्रतिपूर्ती बिले सादर करण्याची परवानगी दिली होती. मात्र, या योजनेंतर्गत वाढीव खर्च होऊ लागल्याने, महापालिकेच्या वैद्यकीय धोरणात बदल केला. नवीन वैद्यकीय धोरणांतर्गत एक सप्टेंबर २०१५ पासून महापालिका कर्मचा-यांना धन्वंतरी स्वास्थ्य योजना लागू केली होती. महापालिका सेवेतील सुमारे साडे सात हजार कर्मचारी तसेच काही दिवसांपूर्वीच या योजनेत महापालिका सेवेतील शिक्षकांनादेखील सामावून घेतले. याशिवाय सेवानिवृत्त कर्मचारी यांना देखील ही योजना ऐच्छिक पद्धतीने लागू करण्यात केली होती. त्यामुळे लाभार्थीची संख्या दहा हजारांपेक्षा अधिक आहे.
या योजनेंतर्गत महापालिका सेवेतील कर्मचा-यांच्या दरमहा वेतनातून तीनशे रुपयांची कपात केली जात आहे. तर सेवानिवृत्त कर्मचारी अथवा अधिका-यांच्या वेतनातून दरमहा दीडशे रुपये कपात केली जात होती. या योजनेचा लाभ कर्मचारी व त्याची पत्नी अथवा पती यांच्याबरोबरच अठरा वर्षाखालील दोन पाल्ल्यांना याचा लाभ घेता येत आहे. त्याकरिता संबंधित विभागाकडून त्या कर्मचा-याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाते. सेवानिवृत्तीनंतरही ही योजना चालू ठेवायची की नाही, याचा निर्णय घेण्याची जबाबदारी संबंधित कर्मचा-यांवर सोपविली होती. धन्वंतरी योजनेमुळे मोठ्याप्रमाणार महापालिकेचा खर्च होत होता. त्यामुळे आरोग्य विमा विषयक नवीन धोरण स्विकारण्यात येणार आहे. आरोग्य धोरणात बदल करण्याची चर्चा सुरू आहे.