breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

कलाकारांच्या गुणांना वाव देण्याची महाराष्ट्राची संस्कृती : अमित देशमुख

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

कलाक्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांच्या गुणांना वाव देण्याची महाराष्ट्राची संस्कृती असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज येथे केले.

दादर येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे श्री. देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य शासनाचा २०१९-२० या वर्षातील ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार वितरण सोहळा’ सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने  आयोजित करण्यात आला. त्यावेळी श्री.देशमुख बोलत होते. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराची पार्श्वभूमी विशद करुन श्री.देशमुख म्हणाले, कलाक्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना मुंबईसह महाराष्ट्राने प्रोत्साहन व प्रेम दिले आहे. हे राज्याचे वैशिष्ट्य आहे. देशातील विविध क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या गुणांना वाव देऊन राज्याने नेहमीच त्यांचा सन्मान केला आहे. कलाक्षेत्रात काम करताना कलाकारांच्या अपेक्षा असतात त्या पूर्ण करण्याकडे तसेच कलाक्षेत्राला वाव देण्याकडे राज्य सरकारचा कल असून सांस्कृतिक क्षेत्रात अधिक प्रोत्साहन देण्यासाठी काम करण्यात येईल, असेही श्री.देशमुख यांनी सांगितले.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर, मोहम्मद रफी आणि किशोर कुमार या दिग्गज गायकांसोबतचे अनुभव विशद करुन श्रीमती खन्ना म्हणाल्या, महाराष्ट्र शासनाने माझ्या कार्याची दखल घेऊन पुरस्कार दिल्याबद्दल राज्य सरकारचे आभार मानते.

ज्येष्ठ संगीत दिग्दर्शिका उषा खन्ना यांचा ‘लता मंगेशकर पुरस्कारा’ने सन्मान

भारतीय चित्रपटसृष्टीत संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या प्रसिद्ध ज्येष्ठ संगीत दिग्दर्शिका उषा खन्ना यांना महाराष्ट्र शासनाचा 2019-20 या वर्षातला ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 5 लाख रुपये रोख, मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीतील निवडक संगीतकारांमध्ये उषा खन्ना यांचा समावेश केला जातो. त्या 78 वर्षाच्या असून त्यांनी त्यांच्या ३० वर्षाच्या कारकिर्दीत तब्बल दिडशेहून अधिक चित्रपटांना संगीत दिले आहे. त्यांनी 1959 मध्ये  ‘दिल देके  देखो’ या पहिल्या चित्रपटास संगीत देऊन कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर ‘छोडो कल की बातें’ जिसके लिये सबको छोडा’ ‘शायद मेरी शादी का खयाल’ जिंदगी प्यार का गीत है’  मधुबन खुशबू देता है’ आदी अविस्मरणीय गीते त्यांनी दिली आहेत. संगीतकार म्हणून त्यांनी ‘दिल परदेसी हो गया’ या चित्रपटास शेवटचे संगीत दिले.

या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला पालकमंत्री अस्लम शेख, ज्येष्ठ संगीतकार सर्वश्री आनंदजी शाह, अशोक पत्की, ज्येष्ठ चित्रपट निर्माते किरण शांताराम, पद्मभूषण उदित नारायण, श्रीमती आदिती देशमुख, सांस्कृतिक कार्य विभागाचे उप सचिव विलास थोरात, संचालक विभिषण चौरे, संयोजक  पुनीत शर्मा आणि कलारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्रीमती खन्ना यांनी दिग्दर्शित केलेले 23 सुप्रसिद्ध गितांचे बालाजी क्रिएटर्स द्वारे सादरीकरण करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button