breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

आता मराठा समाज “गनिमी काव्या”चे शस्त्र उपसणार; मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय

  • मुक मोर्चाने सरकारला फरक पडेना
  • पुढील मोर्चाची तारिख, वेळ, ठिकाण गोपनिय राहणार
  • मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

पिंपरी– मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी मंत्रीमंडळात मंत्र्यांची समिती गठीत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्याला नऊ महिन्यांचा कालावधी उलटला. तरी, कोणतीही समिती नेमली गेली नाही. मुख्यमंत्री खोटे जीआर काढून कार्यकर्त्यांच्या सहकार्याने “व्हॉट्सअॅप” किंवा “फेसबुक”सारख्या सोशल माध्यमातून प्रसिध्द करतात. आजवर भाजप सरकारने मराठा समाजाची दिशाभूल केली. समाजाच्या मागण्यांसाठी जाहीर मुकमोर्चे काढून सरकारला फरक पडला नाही. यापुढे मोर्चाची तारिख, वेळ अथवा ठिकाण जाहीर केले जाणार नाही. सरकारच्या विरोधात “गनिमी काव्या”ने मोर्चे काढले जातील. दरम्यान, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सरकारच जबाबदार राहील, अशी घोषणा मराठा क्रांती मोर्चाचे पुणे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी शनिवारी (दि. 16) पिंपरी येथे पत्रकार परिषदेत केली.

 

मराठा आरक्षण, शेतक-यांची कर्जमाफी, शेती मालाला हमी भाव, कोपर्डी प्रकरण, शिवस्मारक, अनुदान, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलत, शिष्यवृत्ती, वसतीगृह, अॅट्रॉसिटीबाबत कमिटी नेमणे, धर्मा पाटील कुटुंबियांना मदत, रामेश्वर भुसारी यांना मंत्रालयात मारहाण, योगेश पवार याची तक्रार आदी प्रश्नांवर पुढील रणनिती ठरविण्यासाठी मराठा समाजाची बैठक बालेवाडी येथे शनिवारी पार पडली. बैठकीनंतर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक समितीने पिंपरीत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. यावेळी पुणे जिल्हा समन्वयक आबासाहेब पाटील, शरद काटकर, विवेक पाटील, संतोष सुर्याराव, विवेकानंद बाबर, महेश डोंगरे, योगेश पवार, रामेश्वर भुसारी, शरद जाधव, सुरेखा सांगळे, ज्ञानेश्वर गायकवाड, अंबादास कातुरे, ज्ञानेश्वर कवडे, वैभव शिंदे, राजेंद्र देवकर, किरण सुर्यवंशी, ज्ञानेश्वर भुसारे, अमित धाडगे, हेमंत बर्गे, बाबा शिंदे, विवेकानंद बाबर, संजय सावंत, अनिल शिंदे, तुषार आमकरख महेश राणे, चंद्रकांत सावंत आदी उपस्थित होते.

 

आबासाहेब पाटील म्हणाले की, आरक्षणाच्या मुद्यावरून इतर जाती धर्मातील बांधवांची दिशाभूल केली जात आहे. आमची मागणी स्वतंत्र आरक्षणाची आहे. अन्य समाजातील बांधवांच्या आरक्षणाला धक्का न लागू देता आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा उभा करणार आहोत. आजपर्यंत सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. यापुढे सरकारच्या आश्वासनाला भुलणार नाही. आता थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर गनिमी काव्याने धडक मोर्चे काढले जातील. त्यासाठी स्वतंत्र कमिट्या तयार करून सरकारच्या विरोधात राज्यभर वातावरण तयार करणार आहोत, असेही पाटील म्हणाले.

 

शरद काटकर म्हणाले की, मराठा समाजाच्या मागण्यांसाठी राज्यभरात 58 मोर्चे काढले. त्याला 11 महन्यांचा कालावधी उलटला आजवर सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली. फसवी आश्वासने दिली. प्रत्यक्षात कसलाही लाभ नाही. मराठा समाजातील विद्यार्थी 90, 92 टक्के गुण मिळवतात. परंतु, इतर समाजातील त्यांच्या शेजारच्या मुलाची उच्च शिक्षणासाठी निवड होते. मात्र, मराठा समाजातील मुलाला शिकता येत नाही, ही शोकांतिका आहे. मराठा विद्यार्थ्याला 50 टक्के शूल्क माफीची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात सरकारने आदेश काढला नाही. केवळ पोकळ आश्वासने देऊन दिशाभूल करण्याचे काम मंत्रीमंडळातील मंत्री करत आहेत. एमपीएससी आणि युपीएससी चाचणी परिक्षेत मराठा विद्यार्थी 1 किंवा 2 मार्कांनी घसरतो. मात्र, त्याच्यापेक्षा कमी मार्क्स असलेला इतर जाती प्रवर्गातील विद्यार्थी अधिकारी होतो.

 

तुळजापूरात शुभारंभाचा जागरण गोंधळ…

मराठा क्रांती मोर्चाच्या दुस-या पर्वाची सुरूवात 5 जून रोजी राजमाता जिजाऊंच्या दर्शनाने झाली. आता 29 जून रोजी तुुळजापुरातील आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक होऊन मोर्चा समन्वयक समिती जागरण गोंदळ घालणार आह. तुळजापूर या पुण्यनगरीतून सरकारच्या विरोधात मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी आवाज उठविला जाणार आहे. जिल्हानिहाय कमिट्या नेमून सरकारच्या विरोधात समाजाला जागे करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मात्र, यापुढची आंदोलने गनिमी काव्याने केली जातील. कोणत्याही प्रकारचा आक्रोष अथवा पूर्वसूचना देऊन आंदोलने केली जाणार नाहीत. मागण्या मान्य करण्यासाठी आदल्या-मधल्या मंत्र्यांना न भेटता थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मराठा समुदायासह धकड देऊन त्यांच्याशी चर्चा केली जाईल, अशी माहिती समन्वयकांनी सांगितली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button