breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक संस्थाकडून अडवणूक, संपुर्ण शैक्षणिक फी भरण्याचा तगादा

– पिंपरी चिंचवडमधील अनेक नामाकिंत शैक्षणिक संस्थेतील प्रकार
– आरक्षणाचे दाखले देवून फी मध्ये मिळत नाही सवलत 
विकास शिंदे 
पिंपरी ( महा ई न्यूज ) –  भाजप सरकारकडून आम्ही मराठा समाजाचे तारणहार असून आम्हीच समाजाला आरक्षण दिल्याचे ढोल बडवून डंगा पिटला. आरक्षण दिल्याचे सर्व श्रेय त्यांनी लाटले. मात्र, प्रत्यक्षात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत आरक्षणाचा लाभ मिळत असला तरी शैक्षणिक फी मध्ये सवलत मिळत नसून पालकांना संपुर्ण फी भरावी लागत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याबाबत पालकही संस्थेविरोधात बंड अथवा विरोधात जाण्याच्या मनस्थितीत नसून आपल्या पाल्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये, म्हणून पालकही संस्थेमध्ये चिडीचूप सर्व फी भरू लागले आहेत. यामुळे ख-या अर्थाने मराठा समाजाला आरक्षण मिळूनही शैक्षणिक फी सवलतीत आजही वंचित राहू लागला आहे.
पिंपरी चिंचवड शहरात अनेक नामाकिंत शैक्षणिक संस्थेत मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आरक्षणाचा फायदा मिळत नसल्याचा दिसत आहे. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश घेताना संस्थेकडून अडवणूक होत असून संपुर्ण शैक्षणिक फी भरण्याचा तगादा लावला आहे. त्यामुळे राज्य शासनाने खरचं मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे का? असा सवाल पालकांमधून उपस्थित होत आहे.
मागील २५ वर्षांपासून मराठा आरक्षणाचे घोंगड भिजत ठेवण्यात आलं होते. परंतु, आता हा प्रश्न बऱ्याच अंशी निकाली निघाला आहे. 15 जूलैला काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने 16 टक्के मराठा समाजाला आरक्षण देवून जीआर काढला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यानंतर राज्यभरात 58 मोर्चे, शेकडो समाज बांधवानी आरक्षणासाठी बलिदान दिले. त्यानंतर उच्च न्यायालयाने मराठा समाजाला 13 टक्के आरक्षण देण्याचे सांगितले.
राज्यात भाजप सरकार असल्यामुळे मराठा आरक्षणाचे संपूर्ण श्रेय भाजपने घेतले. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अनेक ठिकाणी सत्कार करण्यात आले. इतर मंत्र्यांचे देखील सत्कार समारंभ पार पडले. त्यानंतर मराठा आरक्षण न्यायालयात टिकल्यानंतर अनेक ठिकाणी लागू देखील झाले आहे. त्यानुसार मराठा समाजातील मुलांना जातीचे प्रमाणपत्र देण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड शहरात अनेक नामाकिंत शिक्षण संस्था कार्यरत आहेत. त्या शैक्षणिक संस्थामध्ये दहावी व बारावीनंतर विद्यार्थ्यांना ज्यूनिअर आणि महाविद्यालयीन काॅलेजला शैक्षणिक प्रवेश घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात सुरु आहे. अनेक विद्यार्थ्यांनी जातीचे प्रमाणपत्रानूसार शाळा, काॅलेजमध्ये प्रवेश घेतले. पण, संस्थेच्या संपुर्ण शैक्षणिक फी मध्ये सवलत मिळत नसल्याची बाब निर्दशनास आली आहे. त्यामुळे मराठा समाजाचे विद्यार्थी शैक्षणिक सवलतीपासून वंचित राहू लागले आहेत.
———————-
प्रवेश घ्या, पण आता संपुर्ण फी भरा… 
पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयात एका विद्यार्थ्यांने एम.ए. राज्यशास्त्र विभागासाठी प्रवेश घेतला आहे. एम.ए. साठी वर्षभरास साधारणता सुमारे आठ हजार रुपये शैक्षणिक फी आहे. सदरील विद्यार्थ्यांने मराठा आरक्षणाचा दाखला,  उत्पन्नाचा दाखला प्रवेश अर्जाबरोबर जोडून एम.ए. वर्गासाठी प्रवेश घेताना त्या विद्यार्थ्याला शैक्षणिक फी मध्ये कोणतीही सवलत दिलेली नाही. त्याला संपुर्ण शैक्षणिक फी भरण्यास सांगितलेले आहे. त्यामुळे सदरील विद्यार्थ्यांने महाविद्यालयात चाैकशी केली असता, ते शिक्षक म्हणाले की, मराठा आरक्षण लागू केलेले आहे. परंतू, तुम्ही प्रवेश घेताना आता संपुर्ण शैक्षणिक फी भरा, त्यानंतर छत्रपती शाहू महाराज फेलोशिपचा फाॅर्म भरा, शासनाकडून तुम्हाला शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर तुम्ही भरलेली फी आम्ही परत देवू, असे संस्थेकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेदरम्यान संपुर्ण शैक्षणिक फी भरावी लागत आहे. यामुळे मराठा आरक्षण असूनही फी मध्ये कोणतीच सवलत मिळत नसल्याने मराठा विद्यार्थी वंचित राहू लागले आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button