Uncategorizedताज्या घडामोडी

कळवण तालुक्यातील दळवट व आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के

नाशिकः कळवण तालुक्यातील दळवट व आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के नेहमीच जाणवतात. परंतु भूकंपाचे केंद्र आता दिंडोरीकडे सरकल्याचा प्रत्यय येत आहे. गेल्यावर्षी दिंडोरी तालुक्यात वणी जवळील बाबापूर आणि भातोळी या गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर मंगळवारी रात्री दिंडोरी शहरासह तालुक्यातील काही गावांमध्ये पहिल्यांदाच भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या धक्क्यांमुळे संबंधित ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली असून, या गावांमध्ये भूकंपाबाबत जनजागृती अभियान राबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांनी बुधवारी दिली.

मंगळवारी रात्री दिंडोरी तालुक्यात तीन धक्के बसले. पहिला धक्का रेश्टर स्केलवर ३.४ एवढा सर्वाधिक नोंदविला गेला. या धक्क्यांमुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसली तरी लोक प्रचंड भयभीत झाले आहेत. कळवण तालुक्यातील दळवट परिसरातील केंद्र दिंडोरीकडे सरकल्याचा प्रत्यय येत असल्याची माहिती तहसीलदार पंकज पवार यांनी दिली. पहिल्यांदाच दिंडोरी शहरासह आसपासच्या गावांमध्ये मंगळवारी (दि. १६) भूकंपाचे धक्के जाणवले. नाशिक शहरापासून साधारणत: १६ ते २० किलोमीटरवर ढकांबे, इंदोरे, जांबुटके, मडकी जांब, मानोरी, हातनोरे, निळवंडी, उमराळे (बु), तळेगाव, वनारवाडी, पाडे या गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. मोठा आवाजही झाला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली. त्यांनी ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदारांशी संपर्क साधून त्यांना या धक्क्यांबाबत माहिती दिली.

पूर्वी कळवण तालुक्यातील दळवट आणि पेठ तालुक्यातील गोंदे येथेही असे धक्के यापूर्वी बसले आहेत. परंतु दिंडोरीत पहिल्यादांच असे धक्के जाणवले. भूकंपाच्या केंद्र बदलाबाबत संशोधन होणे आवश्यक आहे.

डॉ. जयदीप निकम, भूगर्भ शास्त्रज्ञ

भूकंपाचे धक्क्यांबाबत नागरिक फोनद्वारे विचारणा करीत असल्याचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला कळविले. त्यानुसार भूकंप मापक यंत्राद्वारे तपासणी केली असता शहरापासून १६ ते २० किलोमीटर अंतरावर हे धक्के जाणवल्याची नोंद घेतली आहे.

-चारूलता चौधरी, अभियंता मेरी

मेरी येथील भूकंप मापक यंत्राचे अहवालानुसार मंगळवारी रात्री ८ वाजून ५८ मिनिटांनी, ९ वाजून ३४ मिनिटांनी आणि ९ वाजून ४२ मिनिटांनी असे तीन भूकंपाचे धक्के जाणवले. रेश्टर स्केलवर त्याची तीव्रता अनुक्रमे ३.४, २.१ आणि १.९ नोंदविली गेली.

-भागवत डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button