breaking-newsमहाराष्ट्र

मनसे लोकसभा निवडणुका स्वबळावर लढणार, ‘कृष्णकुंज’वर हालचालींना वेग

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याच्या विचारात असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून कळतं. ते किती आणि कुठल्या जागा लढवतील, हे कळू शकलेलं नाही, पण मनसैनिकांचा ‘जोश’ आणि मनसेच्या मतदारांचा उत्साह ‘हाय’ ठेवण्यासाठी रिंगणात उतरण्याची तयारी ‘कृष्णकुंज’वर सुरू झाली आहे. या संदर्भातील अधिकृत घोषणा उद्या मनसेच्या 13व्या वर्धापनदिनी स्वतः राज ठाकरेच करतील. ते महाराष्ट्रात काही जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला बाहेरून पाठिंबा देण्याचीही शक्यता आहे.

गेल्या दीड-दोन वर्षांपासून राज ठाकरे सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारभारावर टीकेची झोड उठवताहेत. जाहीर भाषणांमधून आणि व्यंगचित्रांमधून ते मोदी सरकारला फटकारत आहेत. नोटाबंदी, जीएसटी, बुलेट ट्रेन इथपासून ते अगदी पुलवामा हल्ला आणि ‘एअर स्ट्राईक’पर्यंतच्या घडामोडींवरून त्यांनी मोदी सरकारवर थेट निशाणा साधला आहे. मोदी-शहा जोडीच्या पराभवासाठी विरोधकांनी एकत्र यावं, असं आवाहनही त्यांनी केलं होतं. या महाआघाडीत जायला ते ‘मनसे’ तयार होते. राष्ट्रवादीचे नेते त्यांना घ्यायलाही तयार होते. परंतु, काँग्रेसनं ‘इंजिना’ला लाल कंदील दाखवला आणि ‘राजमार्ग’ खडतर झाला. त्यांचं ‘कल्याण’ होता-होता राहिलं.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नकार-होकारात बराच वेळ गेला. तो पर्याय बाद झाल्यानं, आता पुढे काय, हा प्रश्न तमाम मनसैनिकांना पडला आहे. त्याचं उत्तर राज ठाकरे यांनी शोधलंय आणि ते उद्या स्वबळाचा नारा देऊ शकतात, असं सूत्राने सांगितलं. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकमध्ये मनसेची चांगली ताकद आहे. राज यांनी अलीकडेच राज्याचा दौरा केला होता. त्यावेळी अनेक भागांमध्ये त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मनसे निवडणूक रिंगणात न उतरल्यास या पाठिराख्यांचा उत्साह मावळू शकतो. कार्यकर्त्यांचं मनोबलही डळमळू शकतं. त्यामुळेच राज पुन्हा एकदा स्वतःची ताकद अजमावण्याच्या तयारीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button