breaking-newsपुणेमहाराष्ट्र

मतमोजणीच्या ठिकाणी निवडणूक कर्मचारी, पोलिसांमध्ये बाचाबाची

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी अंतिम टप्प्यात आल्यानंतर प्रशासनाने मतदान यंत्रे माघारी नेण्यासाठी आणलेली वाहने परवाना नसल्याच्या कारणावरून पोलिस आणि निवडणूक कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. याबाबत तातडीने तोडगा न निघाल्याने तब्बल अडीच तास ही वाहने भर रस्त्यातच उभी होती.

पुणे, बारामती मतदारसंघांसाठी कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य गोदाम येथे मतमोजणी पार पडली. बारामती मतदारसंघाची मतमोजणी २४ फेऱ्यांमध्ये नियोजित वेळेत पार पडली. सायंकाळच्या सुमारास मतमोजणी अंतिम टप्प्यात आल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान यंत्रे माघारी नेण्यासाठी वाहनांना पाचारण करण्यात आले. त्यानुसार गोदामाच्या परिसरात वाहने दाखल झाली. मात्र, मुख्य प्रवेशद्वारापाशी पोलिसांकडून ही वाहने परवाना नसल्याच्या कारणावरून अडवण्यात आली. परिणामी पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाकडून संबंधित वाहनांबद्दल अधिकृत कागदपत्रे प्राप्त होत नाहीत, तोवर गोदामात प्रवेश दिला जाणार नसल्याची भूमिका पोलिसांनी घेतली.

बारामती लोकसभा मतदार संघाच्या सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनी संबंधित वाहने मतदान यंत्रांची वाहतूक करण्यासाठीच निवडण्यात आल्याचे सांगत ही वाहने आत सोडण्यात यावीत, अशी मागणी केली. त्यानंतरही अधिकृत कागदपत्रे प्राप्त होईपर्यंत वाहने न सोडण्याचे पोलिसांनी सांगितले आणि त्यामुळे रस्त्यावर अडीच तास मतदान यंत्रे घेऊन जाणारी वाहने उभी होती.

त्यानंतर शहर पोलिस विशेष शाखेचे उपआयुक्त मितेश घट्टे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेवटी प्रशासकीय अधिकाऱ्यांना कागदपत्रे आणण्याचे सांगण्यात आले. कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतरच संबंधित वाहने आतमध्ये सोडण्यात आली.

निकालानंतर शहरात अनुचित घटना नाही

पुणे : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर शहरात कोठेही अनुचित घटना घडली नाही. पोलिसांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली, असे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी सांगितले.

पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया कोरेगाव पार्क येथील धान्य गोदाम परिसर येथे पार पाडली तसेच  शिरूर आणि मावळ मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रिया बालेवाडीतील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात पार पडली. मतमोजणी केंद्र परिसर तसेच शहरात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बंदोबस्तासाठी दोन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्याची सूचना करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर पोलिसांनी सराईतांवर कारवाई केली होती. पोलिसांनी गेले दोन ते अडीच महिने निवडणुकीच्या दृष्टीने नियोजन केले होते. पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली, असे वेंकटेशम यांनी सांगितले. विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मितेश घट्टे म्हणाले, कोरेगाव पार्क येथील मतमोजणी केंद्राच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतमोजणी केंद्राच्या परिसरात दोन पोलीस उपायुक्त, पाच सहायक आयुक्त, १५ पोलीस निरीक्षक, ६० सहायक निरीक्षक राज्य राखीव दल, केंद्रीय राखीव पोलीस दलाची तुकडी असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बालेवाडी भागात पिंपरी पोलिसांनी ८०० पोलीस बंदोबस्तासाठी तैनात केले होते. मतमोजणी केंद्राच्या परिसरात गालबोट लावणारी एकही घटना घडली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button