breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

‘भूमिपुत्र…’च्या ब्रँडिंगमुळे खासदार बारणेंच्या अडचणी वाढणार?

  • परजिल्ह्यातून आलेल्या मतदारांमध्ये नाराजीचा सूर वाढला
  • स्थानिक- बाहेरचा वाद निर्माण केल्याने सामाजिक दुफळी
पिंपरी । मावळ लोकसभा निवडणुकीत खासदार श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार यांच्यात ‘टक्कर’ होणार आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रचार शिगेला पोहोचला असतानाच बारणे समर्थकांनी सोशल मीडियावर ‘राजपुत्र आणि भूमिपुत्र’ असे ‘मार्केटिंग’ करण्यास सुरूवात केली आहे. मात्र, यामुळे पुण्याव्यतिरिक्त अन्य जिल्ह्यातून पिंपरी-चिंचवडमध्ये राहण्यास आलेल्या मतदारांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे.
मावळ लोकसभा मतदार संघामध्ये पिंपरी, चिंचवड, मावळ तसेच उरण, कर्जत आणि पनवेल या सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश होतो. पुणे जिल्हा आणि रायगड जिल्ह्यात या मतदार संघाचे विभाजन झालेले आहे. वास्तविक, विद्यमान खासदार बारणे आणि प्रतिस्पर्धी उमेदवार पार्थ पवार  दोघेही पुणे जिल्ह्यातील आहेत. भूमिपुत्र… या न्यायाने मतदान करायचे झाल्यास रायगड जिल्ह्यात दोघांनाही ‘उपरे’ म्हणून संबोधले जावू शकते. तसेच, पुणे जिह्यातील दोन्ही उमेदवार असताना ‘भूमिपुत्र’ असा वाद निर्माण करुन सामाजिक दुफळी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दोन्ही उमेदवार हे पुणे जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे स्थानिक आणि बाहेरचा असा मुद्दा उपस्थित करुन वाद निर्माण करणे दोन्ही उमेदवारांसाठी अडचणीचे ठरणार आहे. कारण, रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी विचार केल्यास दोन्ही उमेदवार बाहेरचे होतात. त्यामुळे लोकसभा निवडणूक विचारांवर लढावी. देशातील कोणताही नागरिक कोणत्याही लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवू शकतो. त्यामुळे बारणे समर्थकांचा मुद्दा आमच्यासारख्या परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांसाठी खेदकारक आहे, अशा भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.
खासदार बारणे समर्थकांच्या मते, १०० किलोमीटर दूरवरुन आलेला उमेदवार मावळचा विकास करणार आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. याच न्यायाचे विचार केल्यास गेल्या पाच वर्षांत कर्जत, उरण आणि पनवेल या पिंपरी-चिंचवडपासून १०० ते १२० किलोमीटर दूर असलेल्या परिसरात काहीच विकास झाला नाही, असा अर्थ होतो. याचा विचार बारणे समर्थक करणार आहेत का? असा प्रश्न राष्ट्रवादीच्या गोटातून विचारला जात आहे.
****
परराज्य, परजिल्ह्यातील मतदारांचे मत तुम्हाला नको का?
पिंपरी-चिंचवड हा कामगार नगरी म्हणून ओळखला जाणारा परिसर आहे. त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रातील परजिल्ह्यातून तसेच परराज्यातून नागरिक स्थायिक झाले आहे. काही कुटुंबांच्या तीन-तीन पिढ्या या शहराला आपले मानतात. मग, खासदार बारणे आणि त्यांच्या समर्थकांना केवळ स्थानिक नागरिकांचेच मतदान हवे आहे का? पुणे जिल्ह्या व्यतिरिक्त अन्य जिल्ह्यातून परराज्यातून आलेल्या नागरिकांची मते शिवसेना आणि भाजपला नको आहेत का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button