breaking-newsराष्ट्रिय

भारताच्या चांद्रयान २चे सारथ्य दोन रणरागिणींकडे

रितू करीधाल, वनिता मुथय्या यांच्याबद्दल देशभर अभिमान

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या चांद्रमोहिम २बद्दल देशभर उत्साह सळसळत असून या मोहीमेचे नेतृत्व दोन रणरागिणी करीत आहेत. चांद्रयान २ मध्ये ‘मोहीम संचालक’ आणि ‘प्रकल्प संचालक’ अशी दोन्ही महत्त्वाची पदे अनुक्रमे रितू करीधाल आणि वनिता मुथय्या सांभाळत आहेत. या दोघींनी मंगळ मोहिमेतही मोठय़ा जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) २००८ मधील पहिल्या चांद्रमोहिमेनंतर १० वर्षांनी हाती घेतलेल्या दुसऱ्या मोहिमेतील ‘चांद्रयान २’ची थरारक अवकाशझेप याची डोळा अनुभवण्यासाठी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातील प्रेक्षक गॅलरीची तिकिटे अवघ्या काही तासांत संपली. हे उड्डाण पडद्यावर समालोचनासह पाहण्याची संधी प्रथमच नागरिकांना मिळाली. या वेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंदही उपस्थित होते. या प्रेक्षक गॅलरीची व्यवस्था एप्रिलमध्ये करण्यात आली होती.

‘बाहुबली’ असलेला जीएसएलव्ही मार्क ३ हा प्रक्षेपक चांद्रयान २ घेऊन अवकाशात झेपावण्याचा हा क्षण देशवासीयांसाठी अविस्मरणीय ठरावा. हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. इस्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी या मोहिमेआधी शनिवारी तिरूमला येथे व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले. चांद्रयान २ मोहिमेची तयारी पूर्ण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोहीमेचा उद्देश

  • भारत या मोहीमेद्वारे कुणीही धांडोळा न घेतलेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणार आहे. तेथे पाण्याबरोबरच हेलियम ३ चा शोध घेतला जाणार आहे.
  • यान चंद्रावर उतरेल तेव्हा तेथे १५ मिनिटांचा थरार निर्माण होईल.

चांद्रयानाचा प्रवास

चांद्रयान २ वर एकूण १३ पेलोड असून त्यात भारताचे पाच, युरोपचे तीन, तर अमेरिकेचे दोन आणि बल्गेरियाचा एक पेलोड असेल. नासाचा रेट्रोरिफ्लेक्टर अ‍ॅरे हा पेलोड यात आहे. उड्डाणानंतर १६ मिनिटांत चांद्रयान २ १७० बाय ४०४०० किमी या पृथ्वीच्या कक्षेत जाईल. तेथून त्याची कक्षा १.०५ लाख कि.मी. वाढवण्यात येईल.  नंतर ते चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. चांद्रयानातील लँडरचे नाव ‘विक्रम’ आहे. ते डॉ. विक्रम साराभाई यांच्या स्मरणार्थ देण्यात आले आहे, तर रोव्हरचे नाव  ‘प्रज्ञान’ आहे. प्रज्ञान ही सहा चाकांची बग्गीसदृश्य गाडी असून ती एक चांद्र दिवस किंवा १४ पृथ्वी दिन या काळात अर्धा किमी फेरफटका मारील. ‘विक्रम’ हे लँडर सहा सप्टेंबरला तेथे उतरेल.

चांद्रयान २ ची वैशिष्टय़े

  • चांद्रयान २ चे वजन ३,८५० किलो
  • यानाचे ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर असे तीन भाग
  • यान ५४ दिवसांच्या प्रवासानंतर चंद्रावर उतरेल

भारत चौथा पराक्रमी

ही चांद्रमोहीम गुंतागुंतीची आहे. चांद्रयान २ चंद्रावर उतरेल तेव्हा भारत जगातला चौथा पराक्रमी देश ठरेल. यापूर्वी रशिया, चीन आणि अमेरिकेने असा पराक्रम साधला आहे. इस्रायलची चांद्रमोहीन अलीकडेच फसली होती. अशा मोहिमेत यशाची ५० टक्के शक्यता असते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button