breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड

भाजपाच्या ‘राम-लक्ष्मण’ जोडीमध्ये अखेर दिलजमाई; देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी ?

  • स्थायी समितीमधील ‘त्या’ वादावर पक्षश्रेष्ठींच्या मदतीने पडदा
  • भाजपाच्या एका बड्या नेत्याने घडवून आणली बैठक

पिंपरी / अमोल शित्रे

पिंपरी-चिंचवडचे कारभारी भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत घडवून आणलेल्या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्ती केल्याने दोन्ही आमदारांमध्ये दिलजमाई झाली आहे. आता दोन्ही आमदारांच्या समर्थकांत सुरू असलेल्या वादावर पडदा पडला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यावर शरसंधान साधत अक्षरषः राडा घातला. त्याला प्रत्युत्तर देऊन विकासकामांचे निर्णय घेण्यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या गटाने राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांसोबत एकजूट केली. त्याची चीड आल्याने जगताप समर्थकांनी सभागृहात हाहाकार घालून सभापती संतोष लोंढे यांना सभा तहकूब करण्यास भाग पाडले. तसेच, पालिकेच्या मासिक सर्वसाधारण सभेत देखील जगताप आणि लांडगे गटामध्ये एकवाक्यता नसल्याने विरोधकांकडून सभागृहाची दिशा बदलण्याचा प्रयत्न झाला. विरोधकांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्याने जगताप आणि लांडगे यांची शहरावरील पकड ढिली होत चालल्याचा प्रत्यय आला. याचा भाजपाला भविष्यात फटका बसण्याचे संकेत मिळाल्याने चंद्रकांत पाटलांनी याचा धसका घेतल्याचे चित्र या बैठकीतून दिसते.

भाजपाचे आजही तीन गट सक्रिय असून त्यांच्यामध्ये एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट जाणवते. स्वतःला निष्ठावंत समजणा-या भाजप पदाधिका-यांचा गट सध्या कोणत्याच भूमिकेत नसतो. त्यामुळे जगताप आणि लांडगे यांच्या गटातील नगरसेवक या-ना-त्या मुद्यांवरून एकमेकांना भिडताना दिसतात. दोन आमदार सोडले तर भाजपाच्या एकाही नेत्याला स्थानिक पातळीवर गणले जात नाही. त्यामुळे दोघांच्या भांडणात कोणी मध्यस्ती करायला शक्यतो जात नाही. मध्यस्ती केलीच तर संबंधित नेत्याचे राजकीय भवितव्य संकटात पडण्याची चिंता असते. त्यामुळे जगताप-लांडगे गटातील टोकाला गेलेल्या वादाच्या ज्या काही बातम्या माध्यमातून समोर आल्या. त्याचा आधार घेऊन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हा वाद देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात नेला.

अन् चंद्रकांतदादा झाले खूष

दोन्ही आमदारांच्या वादावर तोडगा काढण्यासाठी आज सायंकाळी चंद्रकांत पाटील यांनी मुंबईमध्ये जगताप, लांडगे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात समजोता बैठक घडवून आणली. हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने दोन्ही आमदार त्याठिकाणी उपस्थित होते. दोघांमधल्या वादाचे मुद्दे समजून घेऊन फडणविसांनी दोघांची समजूत काढल्याची माहिती कळते आहे. दोन्ही आमदारांचा वाद मिटवण्यात फडणवीसांना यश आल्याने चंद्रकांत पाटील जाम खुश झाल्याचे दिसतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button