breaking-newsमहाराष्ट्र

भाजपने भरभरुन दिले, मग पक्ष बदलाचा विचार स्वप्नातही नाही – आमदार शिवाजी नाईक

शिराळा (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणूकीदरम्यान कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव भाजपात जाण्याचा निर्णय सर्वांना विश्वासात घेवून घेतला. गेल्या साडेतीन वर्षांत रखडलेली सगळी कामे मार्गी लागल्याने सरकारच्या कामकाजावर समाधानी आहे. त्यामुळे कॅाग्रेस-राष्ट्रवादीसह अन्य कोणत्याच राजकीय पक्षात जाणार नाही, असा खुलासा आमदार शिवाजी नाईक यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, शिराळ्यासह जिल्ह्यात पक्ष बदलाबाबत सुरु असलेल्या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे.
शिराळा येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष  रणधीर नाईक, भाजपा तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील उपस्थित होते.
आमदार नाईक म्हणाले की , भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय आम्ही कोणा एकाच्या सल्ल्यावरून किंवा सांगण्यावरून घेतला नसून २०१४ साली कार्यकर्त्यांच्या व्यापक बैठकीत तत्कालीन राजकीय व सामजिक परस्थीतीतीनुसार शिराळा-वाळवा तालुक्यातील आमच्या समर्थक कार्यकर्त्यांच्या आग्रह व सूचनेनुसार घेतला आहे. आमचे नेहमीच स्वतंत्र अस्तित्व राहिले आहे. हे देखील सर्वश्रुत आहे. १९९९ पासून २०१४ पर्यंतच्या आमच्या राजकीय विरोधकांच्या त्रासाला कंटाळून आणि जागतिक पटलावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेली भूमिका पाहून कार्यकर्त्यांच्या सूचनेवरून आम्ही भारतीय जनता पार्टीत जाण्याचा निर्णय घेतला होता. आमच्या या भूमिकेचे त्यावेळी खासदार राजू शेट्टी यांनी स्वागत केले होते. महाआघाडीत ते  आमच्या सोबत प्रचार यंत्रणेत सहभागी होते.
       २०१४ पूर्वी आम्ही कॉंग्रेस व राष्ट्रवादीत काम केले आहे. मात्र सातत्याने त्या पक्षातील मंडळीनी आम्हाला केलेला विरोध आणि आमच्या विरोधातील कारवाया पाहता. परत अशा पक्षात जायचा विचार आम्ही स्वप्नात देखील करणार नाही. आमच्यावर बोलणाऱ्या व लिह्णाऱ्या लोकांनी सुद्धा तो विचार करू नये. उगाचच काल्पनिक बोलून व लिहून लोकांच्यात गैरसमज पसरवू नयेत. मतदारसंघात आम्ही करत असलेली कामे, सातत्याने लोकहिताचे घेतलेले निर्णय, आमचा असलेला जनसंपर्क त्यामुळे चार वेळा मला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची लोकांनी संधी दिली आहे. २००९ ला कॉंग्रेस-राष्ट्र्वादिची आघाडी असताना देखील आमचा विश्वासघात या पक्षातील मंडळीनीच केला होता. हा अपवाद वगळता लोकन्यायालयात आम्हीच सरस आहोत हे सर्वश्रुत आहे. यासर्व गोष्टींचा अनुभव असल्यामुळे मी व माझे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी सोडून अन्य कोणत्याही पक्षात जाणार नाही. भारतीय जनता पक्षाने गेल्या चार वर्षात प्रचंड निधी विकासकामाकरिता शिराळा मतदारसंघात दिला आहे. अनेक शासकीय योजना आणि लोकहिताचे निर्णय याचा फायदा सर्वसामान्य जनतेला झाल्यामुळे जनता समाधानी आहे. वाकुर्डे बुद्रुख उपसा जलसिंचन योजना, गिरजवडे तलाव, प्राथमिक आरोग्य केंद्र, वीज उपकेंद्रे, रस्ते, दळणवळणाच्या सोई, शासकीय कार्यालयांच्या इमारतींची कामे, इतर इमारती पाहता या आधीच्या तुलनेत भारतीय जनता पार्टीच्या सरकारने आम्हाला भरपूर निधी उपलब्ध करून दिला आहे. अनेक रखडलेली कामे मार्गी लागली आहेत.
      मला मंत्रीपद देणे किंवा न देणे हा पक्षीय पातळीवरील निर्णय आहे. पक्षाचे १२३ आमदार आहेत, इतर पक्ष आणि संघटना यांचा सरकारला पाठींबा आहे. हे सर्व पाहता मागे पुढे होण्याची शक्यात आहे. याचा अर्थ आम्ही नाराज आहोत असा होत नाही. मंत्रीपद दिले म्हणून हुरळून जाणार नाही आणि नाही दिले म्हणून नाराज सुद्धा असणार नाही. आगामी काळात यापेक्षाही जास्त ताकदीने भारतीय जनता पार्टीचे काम मतदारसंघात करू. २०१९ च्या लोकसभा व विधानसभेला आमच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य कसे मिळेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील राज्याचे जेष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील व इतर मंत्री महोदय व सहकारी यांनी नेहमीच सहकार्य करून आमच्या प्रती आदर दाखवला आहे. त्यामुळे नाराज आहे असे म्हणणे चुकीचे आहे. आम्ही काल ही भाजपात होतो, आजही आहे आणि यापुढेही भाजपात राहू. असेही आमदार शिवाजीराव नाईक शेवटी म्हणाले.
यावेळी बोलताना रणधीर नाईक म्हणाले, पक्ष बांधणी, पक्षाची सभासद नोंदणी, बूथ कमिट्या तयार करणे तसेच भाजपा सरकारचे अनेक निर्णय, राज्यातील व केंद्रातील योजना गावपातळीवर राबविण्यात यश आले आहे. यामध्ये आम्ही जिल्ह्यात अग्रेसर आहे. त्यामुळे लोकांनी इतर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
सुखदेव पाटील म्हणाले, कोणी काही बोलले तरी आमदार शिवाजीराव नाईक आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपा मध्ये समाधानी आहेत. आम्ही भारतीय जनता पार्टी सोडून जाण्याचा विषयच येत नाही.  काही मंडळी आमच्या विरोधकांना बॉम्बची उपमा देत आहेत तर तो आता बॉम्ब राहिला नसून भूसनळा झाला आहे.
यावेळी भाजपाचे विस्तारक पार्थ शेटे, यशवंत ग्लुकोजचे संचालक युवराज यादव, शिवाजी केनचे संचालक उत्तम पाटील, भारत निकम, महादेव पाटील, रमेश गिरी आदी उपस्थित होते.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button