breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पुण्यात १ लाख ७५ हजार मतदार वाढले, महिला आणि तरुण मतदारांच्या संख्येत मोठी वाढ

पुणे | भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात जिल्ह्याने चांगली कामगिरी केली असून अंतिम मतदार यादी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी जाहीर केली. जिल्हा निवडणूक प्रशासनाने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे मतदार यादीत १ लाख ७५ हजार ५९९ मतदारांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे वाढ झालेल्या मतदारांमध्ये महिला मतदारांची संख्या ९७ हजार ३५० पेक्षा अधिक आहे. १८-१९ वयोगटातील ४५ हजार आणि २०-२९ गटातील ६५ हजार ९८४ नवमतदारांची वाढ झाली आहे.

गेल्या वर्षी १ जानेवारी रोजी जिल्ह्याची मतदारसंख्या ७९ लाख ५१ हजार ४२० होती, तर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाआधी २७ ऑक्टोबर २०२३ रोजी ८० लाख ७३ हजार १८३ होती. प्रशासनाने महिला मतदार नोंदणीसाठी विशेष शिबीर, समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी सुट्टीच्या दिवशी शिबिराचे आयोजन, महाविद्यालय आणि सामाजिक संस्थांचा सहभाग, गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदार नोंदणीची सुविधा, उद्योगसंस्थांचा सहभाग असे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याने अंतिम मतदार यादीत मतदारांची संख्या ८१ लाख २७ हजार १९ एवढी झाली आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत पुरुष मतदारांच्या संख्येत ७८ हजार ४९, तृतीयपंथी मतदार २००, परदेशातील मतदार ५७, सैन्य दलातील मतदारांच्या संख्येत ७ ने वाढ झाली आहे. तर दिव्यांग मतदार संख्या ९ हजार २६७ आणि ८० वर्षावरील मतदार संख्येत ३४ हजार १४१ एवढी घट झाली आहे.

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमापूर्वी २७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप यादीच्या तुलनेत १८-४९ या वयोगटातील १ लाख ४१ हजार २९९ मतदार वाढले, तर ५० वर्षावरील मतदारांच्या संख्येत ८७ हजार ४६३ एवढी घट झाली आहे. विशेष म्हणजे या कालावधीत तृतीयपंथी मतदारांची संख्या ६९५ ने वाढली आहे. लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविणे, प्रक्षेपित लोकसंख्यनुसार विशिष्ट वयोगटातील लोकसंख्येनुसार मतदार नोंदणी करुन घेणे आणि वगळण्याबाबत नियोजन, समाजातील भटक्या व विमुक्त जाती, महिला, तृतीयपंथी व्यक्ती व महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांच्या नोंदणीवर भर, मतदार यादी शुध्दीकरणाच्या अनुषंगाने मयत, दुबार स्थलांतरील मतदारांची पडताळणी योग्यरित्या करण्यासाठी मोहिम स्तरावर काम केल्याने अपेक्षित कामगिरी करणे शक्य झाले आहे.

नवमतदार नोंदणीसाठी सामाजिक संस्था, महाविद्यालयांचे सहकार्य

१८-१९ वयोगटातील मतदार नोंदणीस मोठ्या प्रमाणात वाव असल्याने १०५ महाविद्यालयात निवडणुक साक्षरता मंडळाची स्थापना करण्यात आली. विद्यार्थ्यांकडून महाविद्यालय परिसरातच ऑनलाईन मतदार नोंदणी करून घेण्यात आली. वर्शीप अर्थ फाऊंडेशनच्या मदतीने कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत मतदार नोंदणीचे महत्व आणि प्रक्रीया पोहोचविण्यात आली. निवडणूक साक्षरता मंडळाच्या अंतर्गत १०६ महाविद्यालयात मतदार नोंदणी शिबिराचे एकाच दिवशी आयोजन करण्यात येऊन शिबीरामधून सुमारे १८ हजार नवमतदारांची नोंदणी करण्यात आली. जिल्हा निवडणूक कार्यालय व वुई फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने एकूण ८७ महाविद्यालयांमधून १४ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी १४ हजार ८१६ अर्ज भरून घेण्यात आले.

तरुण मतदारांच्या संख्येत ६५ हजारांची वाढ

२०-२९ वयोगटातील नवमतदार नोंदणीसाठी समाजमाध्यमांचा उपयोग करण्यात आला. रेडीओ जॉकी संग्राम खोपडे यांची मतदार जागृती दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. सिनेअभिनेते प्रवीण तरडे यांनीदेखील व्हिडीओ संदेशाद्वारे मतदारांना नोंदणीसाठी आवाहन केले. पदव्युत्तर महाविद्यालयातही नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याने प्रारुप मतदार यादीच्या तुलनेत या वयेागटातील मतदारांच्या संख्येत ६५ हजार ९८४ एवढी वाढ झाली.

मतदारांचे लिंग गुणोत्तर वाढले

महिला मतदार नोंदणीसाठी गावोगावी असलेल्या बचत गटांमार्फत महिलामध्ये मतदार नोंदणीबाबत जनजागृती करण्यासोबत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. ५ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीत महिला मतदारांचे असलेले ९०८ चे लिंग गुणोत्तर, २७ ऑक्टोबर २०२३ अखेर ९१० झालेले होते व अंतिम मतदार यादीत हे लिंग गुणोत्तर ९१५ आहे.

हेही वाचा    –    सोनाली कुलकर्णीचा ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला 

वयोवृद्ध मतदारांच्या पडताळणीसाठी प्रत्यक्ष भेटीवर भर

घरोघरी पडताळणी मोहिमेत नोंदणी न केलेले पात्र मतदार, संभाव्य मतदार, एकापेक्षा अधिक नोंदी, मयत मतदार, कायमस्वरुपी मयत मतदार यांची माहिती अद्ययावत करण्यावर भर देण्यात आला. ८० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांच्या बाबतीत वारंवार आढावा घेऊन प्रत्यक्ष पडताळणी करणेत आली. ज्या मयत मतदारांचे मयताबाबतचे पुरावे प्राप्त होऊ शकत नव्हते त्यांच्या बाबतीत जन्म मृत्यु नोंदणी विभागाकडून मागील ५ वर्षातील माहिती उपलब्ध करुन घेऊन मयत मतदार वगळणीचे काम करण्यात आले. जागेवर न आढळणाऱ्या आणि स्थलांतरीत मतदारांची केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत पडताळणी करुन वगळणी करण्यात आली. या मोहिमेत ९१ हजार ६७० इतके मयत ३७ हजार ४२० इतके स्थलांतरीत मतदार आढळून आले.

मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेत ८०+ वयोगटातील मतदारांची पडताळणी करुन हयात नसलेल्या मतदारांची मतदार नोंदणी अधिनियम १९६० मधील तरतुदी व मुख्य निवडणूक आयोगाने वेळोवळी दिलेल्या निर्देशानुसार वगळणी करणेत आली. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमातंर्गत एकुण १ लाख ७१ हजार ८१७ इतक्या मतदारांची वगळणी करण्यात आली.

दुर्लक्षित घटकांसाठी मतदार नोंदणी शिबीर

तृतीयपंथी मतदारांची नाव नोंदणी करण्यासाठी सहायक आयुक्त समाज कल्याण यांना समन्वय अधिकारी नेमून त्यांचे मार्फत स्वयंसेवी संस्थेच्या बैठका घेण्यात आल्या. नोंदणीकृत असलेल्या तृतीयपंथी व्यक्तींची यादी प्राप्त करुन घेऊन त्यांच्या मतदार नोंदणीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे कार्यालय व सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड अॅक्टीव्हीज पुणे यांचे संयुक्त विद्यमाने शिबिरांचे आयोजन करण्यात आले, सिग्नलवर तृतीयपंथी व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची नाव नोंदणी करण्यात आली. पुणेरी प्राईड संस्था आणि रोटरी क्ल्ब ऑफ पुणेच्या सहकार्याने ढमढेरे बोळ, बुधवार पेठ येथे तृतीयपंथी मतदारांची नोंदणी करणेसाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांच्या माध्यमातून २०० तृतीयपंथी व्यक्तींची मतदार नोंदणी करण्यात आली. ५ जानेवारी २०२३ रोजी ४९५ इतकी नोंद असलेल्या तृतीयपंथी मतदारांची संख्या ६९५ इतकी झाली आहे. भटक्या व विमुक्त जमातीतील मतदार नोदंणीसाठी सामाजिक संस्थांच्या सहाय्याने २१ एवढी शिबीरे घेण्यात आली व त्याअंतर्गत ४३५ मतदारांची नोंदणी करण्यात आली.

५० हजारावर दुबार मतदारांची नावे वगळली

मतदार यादी शुद्धीकरणाच्या अनुषंगाने समान छायाचित्रे असलेली व दुबार नावे असलेली ५० हजारावर नावे वगळण्यात आली आहेत. त्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. मतदार नोंदणी अधिकारी यांनी दैनदिन आढाव्यात त्रुटी व अडचणींचे निराकारण करुन आणि केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत पडताळणी करून समान छायाचित्रे असलेली ४० हजार ३९० आणि १० हजार २०४ दुबार नावे वगळली आहेत.

मतदार नोंदणी वाढविण्याचे प्रयत्न

जिल्ह्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथील नवनर्मित सहकारी गृहनिर्माण संस्थाचा मतदार नोंदणीत सहभाग वाढविण्यासाठी शहर भागातील १९ हजार ६८५ व ग्रामीण भागातील ३ हजार ४०४ संस्थांची माहिती संकलीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष व पत्राद्वारे संवाद साधला आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत हिंजवडी येथे या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. मोहिमेअंतर्गत ३५ हजार ३३६ अर्ज रहिवाश्यांकडून भरून घेण्यात आले.

मतदार नोंदणी सुरूच राहणार

मतदार नोंदणी प्रक्रीया २३ जानेवारीनंतरही सुरू राहणार आहे. पात्र मतदारांनी यादीत आपले नाव नसल्यास नमुना क्र.६ चा अर्ज ऑनलाईन किंवा जवळच्या मतदान केंद्रावर भरावा. मतदार यादीतील नावे तपासण्यासाठी वोटर हेल्पलाईन ॲप किंवा भारत निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाचा उपयोग करावा. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना आणि राजकीय पक्षांनी आपल्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींद्वारे मतदारांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button