breaking-newsपिंपरी / चिंचवडपुणे

भाजपच्या ‘सर्वासाठी घरे’ योजनेच्या विरोधामागे पिंपरी-चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिक?

पिंपरी – मोशी प्राधिकरण येथील गृहप्रकल्पाला स्थानिक नागरिकांसह भाजपच्या नेत्यांनीही विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पामुळे या परिसरातील शांतता धोक्यात येणार असल्याचे कारण दिले जात असले तरी या विरोधाच्या पाठीमागे बांधकाम व्यावसायिक असल्याची चर्चा आहे. एकीकडे प्रधानमंत्री आवास योजना राबवून सर्वाना घरे देण्याची योजना केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारकडून हाती घेण्यात आलेली असताना पिंपरीतील भाजपने गृहप्रकल्पाला केलेल्या विरोधामुळे पक्षाच्या भूमिकेतील विसंगती पुढे आली आहे. सत्ताधारी भाजपची घरांसंबंधी नेमकी भूमिका काय, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

पिंपरी प्राधिकरणाच्या वतीने तब्बल चौदा वर्षांनंतर गृहयोजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामधील बहुतांश प्रकल्पाच्या आवश्यक कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. पेठ क्रमांक सहा येथील मोशी प्राधिकरणामध्ये प्राधिकरणाने ‘रो हाऊस’ आणि सदनिकांचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठीच्या कामाचे आदेशही प्राधिकरणाने ठेकेदाराला दिले आहेत.

ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्थानिक नागरिकांसह भाजपच्या नेत्यांनी या प्रकल्पाला विरोध सुरु केला आहे. प्राधिकरण राबवत असलेल्या गृहप्रकल्पामुळे उच्चभ्रू वस्ती असलेल्या मोशी प्राधिकरणातील शांतता धोक्यात येण्याची शक्यता आहे, असे कारण प्रकल्पाच्या विरोधासाठी दिले जात आहे. या प्रकल्पामध्ये १७ ‘रो हाऊस’, मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठी १२४ आणि आर्थिकदृष्टय़ा मागास गटातील नागरिकांसाठी २६० सदनिका बांधण्यात येणार आहेत. ‘रो हाऊस’ला विरोध करण्यामागे बांधकाम व्यावसायिक असल्याची चर्चा प्राधिकरणात आहे. प्राधिकरणातील भूखंडांवर गृहप्रकल्प करण्याऐवजी या भागातील भूखंडांवर नागरिकांसाठी सुविधा विकसित कराव्यात, अशी मागणी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांनी केली आहे. या भूखंडांवर मैदाने विकसित करावीत, अशीही मागणी करण्यात आली आहे. प्रत्यक्षात परिसरात क्रीडाविषयक विविध मैदाने विकसित करण्यात आली आहेत. ही सर्व मैदाने महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत. मात्र ती नागरिकांसाठी खुली करण्यात आलेली नाहीत. मैदाने नागरिकांसाठी खुली न करता त्यांच्या देखभाल दुरुस्तीची कामे सुरु करण्यात येणार आहेत. याकडे लक्ष वेधून ही मैदाने खुली करावीत, अशी मागणी केली जात आहे.

या प्रकल्पासाठीची आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काम सुरू करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील सर्वासाठी घर हा प्रकल्प भाजपसह सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन पूर्ण करण्यात येईल.

सदाशिव खाडे, अध्यक्ष, पिंपरी प्राधिकरण

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button