breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपचा कारभार म्हणजे “खोटं बोल पण रेटून बोल”; विरोधक दत्ता साने यांची टिका

पिंपरी – महापालिकेत सत्ता आणायची होती म्हणून अनधिकृत बांधकामांच्या मुद्याचे राजकीय भांडवल केल्याची कबुली भाजपच्या नगरसेवकाने भर महासभेत दिली. त्यानंतर विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी भाजपवर आज सोमवारी (दि. 25) सडेतोड टिका केली. शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी राष्ट्रवादीने सीताराम कुंटे समिती नेमली. समितीने त्याबाबतचा अहवाल न्यायालयासमोर सादर केला. दरम्यान, सत्ता गेल्याने हा प्रश्न प्रलंबित राहिला. पुढे भाजप सरकारने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. भाजपचा कारभार म्हणजे खोटे बोल पण रेटून बोल असाच सुरू आहे, असा आरोप साने यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

महापालिकेची सर्वसाधारण सभा गेल्या शुक्रवारी (दि. 22) झाली. भरसभेत अनधिकृत बांधकामांचा विषय निघाल्यानंतर भाजपच्या एका नगरसेवकाने महापालिकेत सत्ता आणण्यासाठी अनधिकृत बांधकामांच्या मुद्याचे राजकीय भांडवल केल्याची कबुली दिली. त्यानंतर दत्ता साने यांनी भाजपवर जोरदार टिका केली आहे.

दत्ता साने म्हणाले की, नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या अनधिकृत बांधकामांचा राजकीय मुद्दा बनवून भाजपच्या नेत्यांनी जनतेच्या भावनेवर मीठ चोळले आहे. उलट राष्ट्रवादी-कॉंग्रेसची राज्यात सत्ता असताना कुंटे समिती नेमण्यात आली. समितीने राज्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत, पंचायत समितींच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांचा अभ्यास करून रितसर अहवाल तयार केला. तो अहवाल न्यायालयासमोर सादर करण्यात आला. दरम्यानच्या काळात आघाडीची सत्ता जाऊन भाजपची सत्ता आली. भाजप सरकारने पुढे यासाठी पाठपुरावा केला नाही. जर पाठपुरावा केला असेल तर शहरातले भाजपचे खासदार, आमदारांनी समोर येऊन जाहीरपणे सांगावे, असे आव्हान साने यांनी दिले.

मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी अनधिकृत बांधकामांची अधिसूचना जारी केल्याचे सांगितले, की लागलीच शहरातल्या भाजपच्या नेत्यांनी फ्लेक्सबाजी करून चमकोगिरी केली. नागरिकांना साखर, पेढे भरवून आनंदी दिवस म्हणून साजरा केला. परंतु, प्रत्यक्षात आजतागायत अनधिकृत बांधकामांच्या बाबतीत भाजप सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही. असे असताना पालिकेच्या सभागृहात सत्तेसाठी राजकीय मुद्दा केल्याचे भाजप नगरसेवक जाहीरपणे कबुल करतात, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, अशी खंत साने यांनी व्यक्त केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button