breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपकडून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, या नेत्यांवर होणार कारवाई

  • आकुर्डीतील एका अलिशान हॉटेलमध्ये घेतला मेळावा
  • करोनाचे सावट असताना धुडकावला आदेश

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

करोना विषाणुचा संसर्ग टाळण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी पुणे जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केले आहेत. त्याचे उल्लंघन करत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन भाजपच्या पदाधिका-यांची सभा घेतली. त्यामुळे भाजपच्याच या मोठ्या नेत्यांकडून जिल्हाधिका-यांच्या आदेशाचे उल्लंघन झाले आहे.

या मेळाव्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, महापौर उषा ढोरे, सचिन पटवर्धन, पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समितीचे माजी सभापती विलास मडिगेरी, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. अमित गोरखे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, महिला पदाधिकारी उमा खापरे, भाजपचे नगरसेवक, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यात सामाजिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रमांना पुढील आदेश होईपर्यंत परवानगी देण्यात येवू नये. तसेच, यापूर्वी देण्यात आली असल्यास ती परवानगी रद्द करण्याचे आदेश साथरोग प्रतिबंध कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावली मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले.

राज्य शासनाने करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 नुसार 13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 2, 3, व 4 मधील तरतूदीनुसार अधिसूचना निर्गमित केली आहे. शासनाच्या या आदेशाची अवज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी राम यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

या नेत्यांवर होणार कारवाई ?

हा आदेश लागू असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने मात्र या आदेशाची पायमल्ली केल्याचे दिसून आले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मर्जीसाठी भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्त्यांची आकुर्डी येथील एका अलिशान हॉटेलमध्ये सभा घेतली. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी पुणे जिल्ह्यासाठी लागू केलेल्या जमाव बंदी आदेशाचे भाजपने उल्लंघन केल्याचे दिसून आले. आता याप्रकरणी भाजपच्या कोणत्या नेत्यावर जिल्हाधिका-यांकडून कारवाई होणार, हे पाहणे गरजेचे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button