पुणेमहाराष्ट्र

भाकरी फिरवताना “तवा’च गायब – राजू शेट्टी

राजू शेटींचा सदाभाऊंवर निशाणा 
पुणे – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी कोणासोबत जायचे, हे अद्याप ठरवले नाही. मागील निवडणुकीत ज्यांच्या सोबत गेलो. त्यामुळे देशात परिवर्तन करण्यात यश आले. मात्र त्यांचा अनुभव लक्षात घेता. स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्व राजकीय पक्षांपासून समान अंतरावर असून लवकरच आगामी निवडणुकीची बाबतची भूमिका जाहीर करू, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिली. तर मागील निवडणुकीमध्ये भाकरी फिरवताना “तवा’च गायब झाला असल्याने आता आम्ही सावध वाटचाल करीत असल्याचे सांगत त्यांनी सदाभाऊ खोतांवर निशाणा साधला.

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी खासदार शेट्टी म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता येऊन चार वर्षांचा कालावधी होऊन गेला. चार वर्षात शेतकऱ्यांच्या दृष्टीने निर्णय घेण्यात हे सरकार अपयशी ठरले असून त्या पार्श्‍वभूमीवर संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दोन विधेयक मांडणार आहे. त्याबाबत काही खासदारांशी चर्चा झाली आहे.विधेयक मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

मान्सूनने आगमन केले अशी चर्चा सर्वत्र झाली, मात्र प्रत्यक्षात मान्सून आलाच नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये सापडला आहे. यावर सरकार काही उपाय योजना करताना दिसत नाही. परदेशात दर तासातील हवामानातील बदल शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोहचवले जाते. हे लक्षात घेता आपल्या सरकारनेही असे करणे गरजेचे आहे. मात्र आपले पंतप्रधान अनेक देशाचे दौरे करतात. त्या दौऱ्यावर अनेक कोटी खर्च झाला आहे. यावर खर्च करण्यापेक्षा त्यांनी शेती विषयी माहिती सांगणारे चॅनेल सुरू करण्याची गरज होती, असे शेट्टी यांनी सांगितले.

कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सेल्फी विथ फार्मर असे आदेश दिले आहेत. त्यावर खासदार शेट्टी म्हणाले की, प्रत्येकाने बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला पाहिजे. मात्र खोत बांधावर गेल्यावर गाल चोळत येतील, अशा शब्दात शेट्टी यांनी खोतांवर टीका केली.

राज्यातील ऊस आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी येत्या दि. 29 जूनला साखर संकुलवर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती खासदार शेट्टी यांनी दिली. एफआरपी थकीत रक्‍कम अजूनही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही. ही रक्‍कम त्वरित द्यावी किंवा साखर आयुक्‍तांनी कारखान्याची मालमत्ता जप्त करावी. तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था खूप वाईट असून दुधाचे दर घसरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जगणे मुश्‍किल झाले आहे. त्यामुळे सरकारने लिटर मागे पाच रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button