भंगाराच्या दुकानांमधून होतेय चोरीच्या मालाची विक्री; नोंदी ठेवण्याचे पोलिस आयुक्तांचे आदेश
पिंपरी |महाईन्यूज|
भंगाराच्या दुकानांमधून चोरीचा माल खरेदी व विकला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहे. त्यामुळे यापुढे भंगार दुकानदारांना त्यांच्याकडे येणाऱ्या मालाची नोंद ठेवावी लागणार, अन्यथा अशा दुकानदारांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून, या भागात कंपन्यांमधील साहित्य चोरीचे प्रमाण वाढले आहे. यासह वाहनचोरीचे प्रकारही वाढले आहेत. चोरटे या मालाची विल्हेवाट लावण्यासाठी भंगारात विकतात. यामध्ये वाहनांच्या सुट्या भागांचाही समावेश असतो. चोरीचा माल विकत घेणाऱ्या भंगार दुकानदारांवर आता पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. यासाठी पोलिसांनी नियमावली तयार केली आहे. त्यानुसार दुकानात विक्रीसाठी येणारा माल घेताना त्या मालाचा फोटो काढणे अत्यावश्यक आहे. तसेच, तो माल ज्याच्याकडून खरेदी केला त्याचे नाव, मोबाईल क्रमांक याची नोंद दुकानदाराने ठेवणे बंधनकारक आहे.
दरम्यान, पोलिसांकडून भंगार दुकानांची तपासणी केली जाणार असून, या तपासणीत रजिस्टरमध्ये नोंद नसलेला माल आढळून आल्यास तो माल चोरीचा असल्याचे समजून तो माल जप्त केला जाईल, तसेच दुकानदारांवर गुन्हाही दाखल केला जाणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.