breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बैलपोळा : बैलांना उदंड आयुष्य लाभू दे, शेतीत भरघोस पीक येऊ दे ; शेतक-यांचे ग्रामदैवताला साकडे  

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – बळीराजाचा देव मानला जाणा-या बैलांचा सण बैलपोळा उपनगरांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. शहरीकरणामुळे कृषीकडे दुर्लक्ष होऊ लागल्याने शहरात अलिकडे बैल दिसेनासे झाले आहेत. तरीही, पारंपारिक शेतकरी असलेल्या काही कुटुंबियांनी बैल आणि आपली परंपरा अजुनही जतन केली आहे. शहराच्या उपनगररांमध्ये बैलपोळ्यानिमित्त बैलांची गावठाणांत वाजत-जागत मिरवणूक काढण्यात आली. बैलांची पूजा करून त्यांना पुरण-पोळीचा नैवेद्य व धान्य बैलांना खाऊ घालण्यात आले. बैलांना उदंड आयुष्य लाभू दे, शेतीत भरघोस पीक येऊ दे, असे साकडे ग्रामदैवताला घालण्यात आले.

तळवडे भागात शेतीचे प्रमाण कमी झाले आहे. परिसरात मोठ-मोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे शेतीक्षेत्र कमी झाले आहे. तसेच, शेतीशी निगडीत जनावरांचे प्रमाणही घटले आहे. तरीही काही शेतकरी अजूनही पारंपरिक शेती करत आहेत. शेतीशी निगडीत असलेले सण-उत्सव ते मोठ्या उत्साहाने साजरे करत आहेत.

वर्षभर मालकांसोबत शेतात राबून काबाडकष्ट करणाऱ्या बैलाचे कौतुक तसेच लाड करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा सण आहे. भाद्रपद आमावास्येच्या दिवशी बळीराजा आणि बैल यांच्या प्रेमाचे प्रतीक असा बैलपोळा साजरा केला जातो. बैलांना सकाळपासूनच नित्याच्या दैनंदिन कामापासून आराम देण्यात आला. बैलांना नदीवर, ओढ्यात नेऊन आंघोळ घालण्यात आली, बैलाच्या खांद्याची हळद व तुपाने मालिश करण्यात आली, तसेच सर्वांगावर गेरुचे तसेच विविध रंगाचे ठिपक देणे, शिंगांना बेगड, सोनेरी लावणे तसेच डोक्‍याला बाशिंग बांधणे, पाठीवर नक्षिकाम केलेली झुल चढवणे, गळ्यात कवड्याच्या व घुंगुरांच्या माळा बांधणे, नवी वेसण, नवा कासरा, पायात करदोड्याचे तोडे बांधून बैलांना सजवण्यात आले होते.

सायंकाळच्या सुमारास सजवलेल्या देखण्या बैलांची वाजंत्र्यांच्या ताफ्यात सनई, ढोल, ताशे, डफ, हलगी यासारख्या पारंपारिक वाद्यांच्या आवाजाच्या तालावर बैलांची मिरवणूक काढून ग्राम प्रदक्षिणा घालण्यात आली. तळवडे गावठाणात असलेल्या मंदिरासमोर बैलांना उभे करुन देवदर्शन करण्यात आले. बैलांना उदंड आयुष्य लाभू दे, शेतीत भरघोस पीक येऊ दे, असे साकडे ग्रामदैवताला यावेळी घालण्यात आले. त्यानंतर घरी आलेल्या बैलांची गृहलक्ष्मीने दृष्ट काढून बैलांना गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य भरवला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button