जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थिनी देवांगणा कलिता हिला जामीन मंजूर
नवी दिल्ली – अँटी सीएए आंदोलनानंतर दिल्लीत उसळलेल्या दंगलीप्रकरणी अटक झालेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थिनी देवांगणा कलिता हिला दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या दंगल काळात देवांगणा कलिता हिने प्रक्षोभक भाषण करून जमावाला चिथावले आणि दंगल घडवली, याचा कुठलाही पुरावा दिल्ली पोलीस न्यायालयात सादर करू शकले नाहीत. त्यामुळे देवांगणा कलिता हिला जामीन मंजूर झाला. मात्र देवांगणा हिला दिल्ली शहर सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
देवांगणा कलिता हिच्या विरोधात पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्याच्या दस्तावेजामध्ये एका डायरीचा आणि पेन ड्राइवचा समावेश आहे. एका बंद लिफाफ्यामध्ये देण्यात आलेल्या या पुराव्यांमध्ये देवांगणा ही शांततापूर्ण आंदोलनामध्ये सहभागी झालेली दिसत आहे. ती कुठच्याही दंगलीमध्ये सामील झाल्याचे सिद्ध झालेले नाही. शांततापूर्ण आंदोलन करणे हा तिचा मुलभूत अधिकारच आहे. देवांगणा हिच्या भाषणाने जमाव प्रक्षुब्ध झाला आहे आणि जमावाने दंगली घडवून आणली, असे कुठेही सिद्ध झालेले नाही. पोलीस तिच्या विरोधात दंगलीचे पुरावे देण्यास असमर्थ ठरले आहेत, असे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुरेश कैत यांनी सांगितले आहे.