breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बेकायदेशीर मंजुर विषयांवरील चर्चेसाठी पुन्हा महासभा घ्या – मारुती भापकर  

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेची शुक्रवारी (दि. 4) पार पडलेली सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात यावी. ही सभा बेकायदेशीर पध्दतीने झाली असून सभेत विनाचर्चा मंजूर झालेल्या विषयाची अंमलबजावणी करु नये. या बेकायदा सभेत मंजूर झालेले सर्व विषय रद्द करुन ते पुन्हा महापालिका सभेच्या विषयपत्रिकेवर घेऊन लोकशाही पद्धतीने त्या विषयांवर सांगोपांग चर्चा घडवून कामकाज व्हावे, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची १९ जानेवारी रोजीची महापालिका तहकुब सभा सोमवारी (दि. ४) पार पडली. सभेमध्ये टाळगाव चिखली येथील जगदगुरु तुकाराम संतपीठ या नावाने कंपनी स्थापन करुन सदर कंपनीचे व्यवस्थापन चालवण्यासाठी संचालक मंडळाची स्थापना करणे, महापालिकेचे सुमारे २५ कोटी खर्च करुन उभारलेले भोसरी येथील १०० बेडच्या रुग्णालयाची इमारत ३० वर्षासाठी खाजगी संस्थेला चालवण्यास देण्याचा विषय व पुणे महानगर परिवहन मंडळासाठी (पीएमपीएमएल) ४८० बसेसची खरेदी करण्यासाठी २३८ कोटी ४५ लाख रुपये देण्याच्या खर्चाला मान्यता देण्याचे विषय विषयपत्रिकेवर होते.

महापालिका सभेतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आंदोलन केले. या गोंधळाचा फायदा घेत हे महत्त्वाच्या विषयांबाबत महापौरांनी कुठलीही चर्चा होऊ न देता सभेच्या कार्यपत्रिकेवरील विषयांचे वाचन न करता किंवा रितसर सभापटलावर विषय न मांडता विषय क्रमांक १ ते १२ मंजूर केले. अशा प्रकारे विषय मंजूर करणे सभाशास्त्राच्या नियमाला धरुन नाही. लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक असून हा सर्व कारभार हुकूमशाही पद्धतीने झाला आहे. त्यामुळे शुक्रवारी झालेली सर्वसाधारण सभा रद्द करून पुन्हा विषय पत्रिका काढून ती सभा घेण्यात यावी. घाईघाईत मंजूर केलेल्या विषयांवर चर्चा करण्याची परवानगी नगरसेवकांना देण्यात यावी, अशी मागणी भापकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button