breaking-newsक्रिडा

फिफा विश्वचषक : झुंजार स्वित्झर्लंडने बलाढ्य ब्राझिलला रोखले

  • जर्मनीपाठोपाठ दुसऱ्या दावेदारालाही विजयी प्रारंभ करण्यात अपयश 

रोस्टोव्ह ऑन डॉन – झुंजार स्वित्झर्लंड संघाने पिछाडीवरून चिवट लढत देताना माजी विजेत्या ब्राझिलला 1-1 असे बरोबरीत रोखल्यामुळे जर्मनीपाठोपाठ फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेतील विजेतेपदाच्या आणखी एका दावेदार संघाला विजयी प्रारंभ करण्यात अपयश आले. विशेष म्हणजे विश्‍वचषक स्पर्धेच्या चौथ्याच दिवशी हे दोन्ही निकाल लागले. कुटिन्होने 20व्या मिनिटाला ब्राझिलला आघाडी मिळवून दिली होती. मात्र स्टीव्हन झुबेरने 50व्या मिनिटाला स्वित्झर्लंडला बरोबरी साधून दिली.

खरे म्हणजे रविवारी झालेल्या अगोदरच्या सामन्यात मेक्‍सिकोने गतविजेत्या जर्मनीवर खळबळजनक विजयाची नोंद केल्यानंतर ब्राझिलला या स्पर्धेपूर्वी विजेतेपदासाठी देण्यात आलेली पसंती योग्य असल्याचे मत जाणकारांनी व्यक्‍त केले होते. परंतु पुढच्याच सामन्यात आघाडी घेतल्यावरही स्वित्झर्लंडवर विजय मिळविण्यात ब्राझिलला अपयश आल्यामुळे या स्पर्धेतील विजेतेपदाचा निर्णय खुला असल्याचेच दिसून आले. आणखी एका एफ गटसाखळी लढतीत कोस्टा रिकाला 1-0 असे पराभूत करताना आघाडीच्या स्थानावर झेप घेतली.

गेल्या विश्‍वचषक स्पर्धेत विजेतेपदासाठी पसंती देण्यात येत असताना उपान्त्य लढतीत जर्मनीविरुद्ध 1-7 अशा पराभवाची नामुष्की पत्करावी लागलेला ब्राझिल संघ त्याची भरपाई करण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे गॅब्रिएल जीझस आणि विलियन यांना प्रशिक्षक टिटे यांनी ब्राझिलच्या आघाडीच्या फळीत स्थान दिले. तसेच चार महिन्यांनंतर स्पर्धात्मक आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या नेमारने ब्राझिलच्या मध्यवर्ती सूत्रसंचालनाची जबाबदारी कुटिन्होवर सोपविली.

कुटिन्होनेही नेमारच्या विश्‍वासाची पुरेपूर परतफेड करताना विसाव्या मिनिटाला एका अफलातून फटक्‍यावर ब्राझिलचे खाते उघडले.ब्राझिलने विक्रमी किंमत मोडून करारबद्ध केलेल्या कुटिन्होने गोलक्षेत्राच्या नजीक चेंडू ताब्यात घेतला आणि कोणाला काही कळण्याच्या आत एका जबरदस्त फटक्‍यावर लक्ष्यवेध करीत ब्राझिलचा पहिला गोल नोंदविला. या वेळी ब्राझिलचा विजय निश्‍चित दिसत होता. परंतु स्वित्झर्लंडने सर्वांचे अंदाज चुकविले.

त्यानंतर नेमारनेही “मॅच प्रॅक्‍टिस’च्या अभावाचे कोणतेही लक्षण जाणवू दिले नाही. त्याने अनेकदा स्विस गोलक्षेत्रावर धडका मारल्या आणि स्वित्झर्लंडच्या बचावफळीची परीक्षा घेतली. नेमारला रोखण्याच्या प्रयत्नात अस्वस्थ झालेल्या स्टीफन लिचस्टीनर, फॅबियन स्कार आणि व्हेलन बेहरामी या स्विस बचावपटूंना “यलो कार्ड’चा फटकाही बसला. मात्र थियागो सिल्व्हा आणि जीझस यांचे धोकादायक ठरू शकणारे हेडर स्वैर गेल्यामुळे ब्राझिलला आपल्या आघाडीत भर घालता आली नाही आणि त्याची किंमत त्यांना उत्तरार्धात मोजावी लागली.

उत्तरार्धातही ब्राझिलचेच वर्चस्व दिसत होते. किमान स्वित्झर्लंडकडून कोणताही धोका दिसत नव्हता. परंतु 50व्या मिनिटाला मिळालेल्या कॉर्नरवर शाकिरीने दिलेल्या चेंडूवर झुबेरने ब्राझिलच्या बचावातील फट अचूक हेरली आणि स्वित्झर्लंडला बरोबरी साधून दिली. बॅकफूटवर गेलेल्या ब्राझिलने लगेचच प्रतिहल्ले सुरू केले. नेमारकडून ब्राझिलला मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु त्याचे फटके दोन वेळा गोलच्या बाजूच्या जाळ्यात जाण्यापलीकडे फारसे काही घडले नाही.
तसेच नेमार आणि रॉबर्टो फर्मिनो यांचे हेडर सरळ स्विस गोलरक्षक सॉमरच्या हातात गेले. मिरांडाला ढकलणाऱ्या झुबेरला रेड कार्ड देण्यात आले नाही. तसेच आकांजीच्या पुशमुळे जीझस कोलमडला, तेव्हा पंचांनी काहीच कारवाई केली नसल्याने ब्राझिलने नाराजी व्यक्‍त केली. परंतु सामन्याच्या निकालावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button