प्लाॅस्टीक बंदीसाठी नागरिकांमध्ये जनजागृती
पिंपरी : महापालिकेने प्लाॅस्टीक बंदीचे महत्व नागरिकांना पटवून देण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. याकरिता महापालिकेने रिक्षा, टेम्पोवर ध्वनिक्षेपक लावून नागरिकांना प्लॅस्टिक बंदीचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. त्यानूसार 19, 20 आणि 21 एप्रिलला तीन प्लाॅस्टीक संकलन मोहीम राबविण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे रिक्षा, टेम्पोचा वापर करुन प्लाॅस्टीक बंदीवर नागरिकांमध्ये प्रबोधन केले जात आहे. महापालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियानातंर्गत तीन दिवसात मार्केट, भाजी मंडई, सार्वजनिक ठिकाणे, माॅल याठिकाणी प्लाॅस्टीक पिशव्यांचे संकलन करण्यात येणार आहे. त्यावर नागरिकांना प्लाॅस्टीक वापरु नये, याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी शहरात काही भागात रिक्षा फिरविण्यात येत आहेत.
याबाबत महापालिकेचे आरोग्य अधिकारी मनोज लोणकर म्हणाले, ‘‘प्लॅस्टिक बंदीचा निर्णय शासनाने अचानक जाहीर केला़ आहे. त्यामुळे शहरात नागरिकांना प्लाॅस्टीक बंदीचे महत्व पटवून देत त्यांना प्लाॅस्टीक पिशव्या बाळगू नये, यावर प्रबोधन करण्यात येत आहे. तसेच कचरा उचलणा-या वाहनांवर ध्वनिक्षेपक लावून प्लॅस्टिक बंदीबाबत जनजागृती केली जात आहे.