breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

प्लास्टिकचा निम्मा कचरा घटला!

प्लास्टिक बंदी लागू झाल्यापासून घनकचऱ्यामध्ये जमा होणाऱ्या प्लास्टिकचे प्रमाण पन्नास टक्क्यावर आले आहे. ही बंदी लागू होण्यापूर्वी राज्यात दिवसाला सुमारे १२०० टन प्लास्टिक कचरा जमा होत असे, त्यामध्ये सध्या ५० टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळातील सूत्रांनी सांगितले.

राज्यात २३ मार्च २०१८ पासून प्लास्टिक बंदीची नवीन नियमावली लागू करण्यात आली होती. त्यानंतर त्या बंदीमध्ये ३० जूनपर्यंत दोनवेळा बदल करण्यात आले. त्यानंतर सुरू केलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या संयुक्त कारवाईत ५ जून २०१९ पर्यंत फक्त सहा हजार ३६९ दुकाने आणि आस्थापनांकडून चार कोटी १२ लाख वीस हजार ५८८ रुपये दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमध्ये आठ लाख ३६ हजार ८७५ किलो प्लास्टिक हस्तगत करण्यात आले. त्याचबरोबर प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यभरातील २७३ कारखाने दोषी आढळल्यामुळे त्यांच्यावर उत्पादन बंदीचा आदेश बजावला. दोषी कारखान्यांमधून दोन लाख ४१ हजार  ६७० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले, तर चार लाख २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

राज्यभरात बहुपदरी प्लास्टिकचा वापर करण्यावरदेखील बंदी घालण्यात आली होती, पण केंद्र सरकारच्या नियमावलीत दुरुस्ती झाल्यानंतर सध्या पुनर्चक्रीत बहुपदरी प्लास्टिक वापरले जाते. एप्रिल २०१८ ते जानेवारी २०१९ या काळात पाच हजार आठशे टन बहुपदरी प्लास्टिक जमा करण्यात आले असून त्याचा वापर इंधननिर्मितीकरता केला जात असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्लास्टिक बाटल्यांच्या पुनर्चक्रीकरणासाठी वापरलेल्या बाटल्या जमा करण्याची संकलन केंद्र सुरू करण्याची जबाबदारी उत्पादकांवर देण्यात आली होती. मात्र या उत्पादकांनी किती बाटल्या जमा केल्या याबद्दल प्रदूषण नियंत्रण मंडळाने मागवलेल्या माहितीला उत्पादकांनी पुरेसा प्रतिसाद दिलेला नसल्याचे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दंडसंहिता..

  • ५ जून २०१९ पर्यंत ६,३६९ दुकाने आणि आस्थापनांकडून चार कोटी १२ लाख वीस हजार ५८८ रुपये दंड वसूल.
  • या कारवाईमध्ये ८,३६,८७५ किलो प्लास्टिक हस्तगत.
  • राज्यभरातील २७३ कारखाने दोषी आढळल्याने त्यांच्यावर उत्पादन बंदीचा आदेश.
  • दोषी कारखान्यांमधून २,४१,६७० किलो प्लास्टिक हस्तगत.
  • दोषी कारखान्यांतून ४,२०,००० रुपयांचा दंड वसूल.

यानुसार वर्षभरात चार कोटी सोळा लाख ४० हजार ५८८ रुपयांचा दंड आणि दहा लाख ७८ हजार ५४५ किलो प्लास्टिक हस्तगत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button